इंग्लंडवर ५७ धावांनी विजय; लॅनिंग-व्हिलानीची जोरदार फटकेबाजी
ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी जेतेपदाला साजेशी खेळी करत महिलांच्या तिरंगी ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत बाजी मारली. अंतिम लढतीत २०९ धावांचा डोंगर उभा करत त्यांनी इंग्लंडला ९ बाद १५२ धावांपर्यंत रोखले आणि ५७ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाची ही खेळी महिला ट्वेंटी-२० क्रिकेट प्रकारातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
नाणेफेकीचा कौल बाजूने लागूनही इंग्लंडने फॉर्मात असलेल्या ऑस्ट्रेलियाला फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीला आलेली बेथ मूनी शून्यावर बाद झाल्यानंतर इंग्लंडला सामन्यावर पकड घेण्याची संधी होती. मात्र दिशाहीन गोलंदाजी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण याचा मोठा भुर्दंड त्यांना भरावा लागला. अॅलिसा हिली आणि अॅश्लेघ गार्डनर यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.
या दोघी माघारी परतल्यानंतर कर्णधार मेग लॅनिंग आणि इलिसे व्हिलानी यांच्या फटकेबाजीने ऑस्ट्रेलियाच्या डावात जीव ओतला. दोघींनी १२ षटकांत १३९ धावांची भागीदारी रचताना संघाला दोनशे धावांचा पल्ला ओलांडून दिला. ३० चेंडूंत ८ चौकारांसह ५१ धावा करणारी व्हिलानी अखेरच्या षटकात बाद झाली, तर लॅनिंग ४५ चेंडूत १६ चौकार आणि एका षटकार लगावत ८८ धावांवर नाबाद राहिली.
प्रत्युत्तरात डॅनियल व्याट, नॅटली शिव्हेर आणि अॅमी जोन्स वगळता इंग्लंडच्या अन्य फलंदाजांना अपयश आले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची कामगिरीही सुरेख झाली. मेगन शूटने सर्वाधिक तीन, तर डेलिसा किमिन्स व अॅश्लेघ गार्डनर यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाने सलग दोन जेतेपद पटकावली. या तिरंगी स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाने यजमान भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका ३-० अशी खिशात घातली होती.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ४ बाद २०९ (मेग लॅनिंग नाबाद ८८, इलिसे व्हिलानी ५१, अॅलिसा हिली ३३, अॅश्लेघ गार्डनर ३३; जेनी गन २/३८) वि. वि. इंग्लंड ९ बाद १५२ (नॅटली शिव्हेर ५०, डॅनियल व्याट ३४, अॅमी जोन्स ३०; मेगन शूट ३/१४);
सामनावीर : मेग लॅनिंग; स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : मेगन शूट.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2018 3:13 am