अखेरच्या षटकांमधील भारतीय फलंदाजांचे कचखाऊ धोरण ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाच्या पथ्यावर पडले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने भारत ‘अ’ संघावर ७ धावांनी मात केली.
अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने ९९ चेंडूंत १८ चौकार आणि ६ षटकारांनिशी १४५ धावांची घणाघाती खेळी साकारल्यामुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने ८ बाद २९८ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरादाखल भारताचा डाव ८ बाद २९१ धावांवर सीमित राहिला. रोहित शर्मा (६६), सुरेश रैना (८३) आणि अंबाती रायुडू (७०) यांनी अर्धशतके झळकावली. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात चार गुण कमावले. त्यामुळे तिच्या खात्यावर दोन सामन्यांत ८ गुण जमा आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन कल्टर-निले (१० षटकांत ३७ धावांत ३ बळी)च्या गोलंदाजीने कमाल केली.