कसोटी सामन्यात प्रत्येक फलंदाजाचा कधी ना कधी कस लागतोच. संघाची पडझड होत असताना कठीण परिस्थितीत एका बाजूने खेळ करत राहणं ही अत्यंत कठीण बाब मानली जाते. कित्येकदा अनेक फलंदाजांनी दोन दिवस सलग फलंदाजी केल्याची उदाहरणं आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाचा पीटर हँटस्काँब हा सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. बांगलादेशविरुद्ध चितगांव येथे खेळण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी करत असताना पीटरने तब्बल साडेचार किलो वजन कमी केलं आहे.

अडीच तास खेळपट्टीवर ठाण मांडून बसलेल्या पीटरने ६९ धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान पीटरचं वजन साडेचार किलोंनी घटल्याचं समजतंय. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ सामन्यात ८० धावांनी पिछाडीवर असला तरीही पीटरच्या या अनोख्या ‘वर्कआऊट’ची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. सध्या चितगांव शहरात तापमान हे ३० अंशावर पोहोचलेलं आहे. याचसोबत वातावरणातील आर्द्रतेमुळे खेळाडूंची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू डिन जोन्स यांनीही आपल्या कारकिर्दीत, भारताविरुद्ध १९८६ साली मद्रास कसोटीत अशाच कडाक्याच्या उन्हाळ्यात फलंदाजी केली होती. पीटरच्या या खेळीनंतर त्यांनीही ट्विटरवरुन त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

बांगलादेशविरुद्धची पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाच्या संघाने गमावली आहे. त्यामुळे आयसीसी क्रमवारीत आपलं स्थान टिकवून रहायचं असल्यास ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकणं महत्वाच आहे. त्यामुळे हँडस्काँबने गाळलेल्या घामाचं चीज होतं का, हे पहावं लागणार आहे.