रविचंद्रन आश्विन, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटी सामन्यात पहिल्या डावात ५३ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. रविचंद्रन आश्विनने पहिल्या डावात ४ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. कर्णधार टीम पेनचं नाबाद अर्धशतक आणि लाबुशेनची संयमी खेळी या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १९१ धावांपर्यंत मजल मारली. परंतू ऑस्ट्रेलियाचे इतर फलंदाज भारताच्या माऱ्यासमोर झटपट बाद झाले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी आश्विनला गृहीत धरण्याची मोठी चूक केल्याचं वक्तव्य माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगने केलं आहे.

“फलंदाजांनी आश्विनविरोधात जरा जास्तच आक्रमक पवित्रा घेतला होता. आश्विन किती चांगला गोलंदाज आहे हे कदाचित त्यांना समजलं नसावं आणि म्हणूनच त्यांनी आश्विनला गृहीत धरलं. ऑस्ट्रेलियाची ही सर्वात मोठी चूक होती. आश्विनच्या गोलंदाजीवर आक्रमक फटकेबाजी करत धावा जमवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न होता, जो पूर्णपणे फसला.” रिकी पाँटींग Channel 7 शी बोलत होता.

अवश्य वाचा – Ind vs Aus : आश्विनच्या जाळ्यात अडकले कांगारु

रविचंद्रन आश्विनने पहिल्या डावात स्टिव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, कॅमरुन ग्रीन, नॅथन लॉयन या फलंदाजांना माघारी धाडलं. याव्यतिरीक्त उमेश यादवने ३ तर जसप्रीत बुमराहनेही २ बळी घेत आश्विनला चांगली साथ दिली.

अवश्य वाचा – Video : लाबुशेनचा सोपा कॅच सोडणाऱ्या पृथ्वी शॉवर भडकला विराट, मैदानातच सुनावलं