News Flash

भारतीय खेळाडूंना त्रास द्यायला मला मजा येते – स्मिथ

ऑस्ट्रेलियात एका कार्यक्रमात स्टिव्ह स्मिथची कबुली

भारतीय खेळाडूंना त्रास द्यायला मला मजा येते – स्मिथ
या शाब्दिक चकमकींमुळे ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा चांगलाच गाजला होता.

स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. यावेळी पहिली कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने भारतावर दबाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र त्यानंतर भारतीय संघाने मालिकेत फॉर्मात येत ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिला होता. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मा यांच्यात बाचाबाची झाली होती. यावेळी इशांतने स्टिव्ह स्मिथची केलेली नक्कल ही सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती.

मात्र स्टिव्ह स्मिथने केलेला हा प्रकार ठरवून केला असल्याचं समोर आलंय. ऑस्ट्रेलियातील एका कार्यक्रमात बोलताना स्मिथनेच याची कबुली दिली आहे. मला भारतीय खेळाडूंना त्रास द्यायला आवडतं, मैदानात असं केल्यानंतर दबावाखाली येऊन किंवा भावनेच्या भरात ते एखादी चूक करुन बसतात असं स्मिथने म्हणलंय.

भारताविरुद्धची मालिका आम्हा सर्व खेळाडूंवर प्रचंड दबाव होता, यामुळेच दोन्ही संघामध्ये मैदानात खटके उडत होते. मी इशांत शर्मा आणि इतर भारतीय गोलंदाजांना दाद लागू देत नव्हतो म्हणूनच इशांतने मला तोंड वेडवाकडं करुन डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याचंही स्मिथ म्हणाला. मात्र भारतात आपल्या संघाने केलेल्या कामगिरीचा आपल्याला अभिमान असल्याचं स्मिथने म्हणलंय. “घरच्या मैदानावर भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्मात होता, त्यामुळे आम्ही एकही सामना जिंकणार नाही असं अनेकांनी भाकित केलं होतं. मात्र या दौऱ्यात आम्ही एक कसोटी जिंकून इतर सामन्यांमध्ये भारताला चांगली लढत दिली.”

सध्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमध्ये मानधनाच्या मुद्द्यावर वाद सुरु आहेत. वेळेत या मुद्द्यावर तोडगा न निघाल्यामुळे खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे सध्या क्रिकेट बोर्ड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये तात्पुरता वाद शमवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा संघ आणि क्रिकेट बोर्ड या समस्येवर कसा तोडगा काढतो हे पहावं लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 6:48 pm

Web Title: australian captain steve smith says he like to sledge indian players
Next Stories
1 न्यूझीलंड ओपनमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी
2 प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये विश्वासाचं नातं असायला हवं – रवी शास्त्री
3 चेतेश्वर पुजाराची अर्धशतकी ‘कसोटी’
Just Now!
X