अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला चांगली टक्कर देतो आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेरीस १ विकेटच्या मोबदल्यात ३६ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या दिवशी युवा शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी सावध सुरुवात केली.

गिल आणि पुजाराने कांगारुंच्या माऱ्याचा सावधपणे सामना केला. या दोघांची जोडी जमतेय असं वाटत असतानाच शुबमन गिल कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या गिलने ६५ चेंडूत ८ चौकारांसह ४५ धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने चेतेश्वर पुजाराही कमिन्सच्या गोलंदाजीवर १७ धावा काढून माघारी परतला. कमिन्सच्या गोलंदाजीवर कर्णधार टीम पेनने पुजाराचा सुरेख पद्धतीने एकहाती कॅच घेतला.

चेतेश्वर पुजारा माघारी परतल्यानंतर हनुमा विहारी आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी मैदानावर स्थिरावतेय असं वाटत असताना लियॉनने विहारीला माघारी धाडलं. यानंतर मैदानावर आलेल्या पंतनेही फटकेबाजी करत भारताची बाजू वरचढ केली.