भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये क्रिकेट सामना सुरू असताना स्लेजिंग होणार नाही असं फार क्वचितच घडतं. सुरूवातीच्या काळात ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतीय खेळाडूंना त्रास द्यायचे. पण नंतर भारतीय संघानेही आक्रमक पवित्रा स्वीकारत जशास तसं उत्तर द्यायला सुरूवात केली. त्यामुळे गेली काही वर्षे या दोन संघांमध्ये मैदानावर बाचाबाची होणं हे अगदी स्वाभाविक झालं आहे. पण सिडनी कसोटीत तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीच्या खेळात असा काही प्रकार घडला की थेट ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला भारतीय खेळाडूंनी माफी मागावी लागली.

नक्की काय घडलं प्रकरण?

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार नोंदवली. त्यानंतर चौथ्या दिवशीही चालू क्रिकेट सामन्यात काही चाहत्यांनी त्याच प्रकाराची पुनरावृत्ती केली. सिराज सीमारेषेवर फिल्डिंग करत असताना हा प्रकार घडला. त्याने सुरूवातीला दुर्लक्ष केलं, पण त्यांच्याकडून वर्णद्वेषी टीका थांबत नाही, हे पाहिल्यानंतर त्याने थेट कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पंचांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर बराच काळ खेळ थांबवण्यात आला होता.

भारतीय खेळाडूंच्या तक्रारीनंतर मैदानात असलेल्या सुरक्षारक्षकांनी तेथील चाहत्यांची चौकशी केली आणि अखेरीस तेथील काही चाहत्यांना तेथून उठवण्यात आलं. घडलेल्या प्रकारात अजिंक्य रहाणे आणि संपूर्ण भारतीय संघ सिराजच्या पाठीशी उभा राहिल्याचं दिसल्याने साऱ्यांनी टीम इंडियाचं कौतुक केलं.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मागितली माफी

या प्रकारानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृत पत्राद्वारे भारतीय संघाची माफी मागत अशा चाहत्यांची गय केली जाणार नसल्याचं सांगितलं. “भारतीय खेळाडूंबद्दल चाहत्यांनी केलेल्या वर्णभेदी टिपण्णीचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया निषेध करते. कोणाच्याही वर्णावरून किंवा इतर गोष्टींवरून हिणवण्याच्या वृत्तीच्या आम्ही पूर्णपणे विरोधात आहोत. शनिवारी घडलेल्या प्रकाराबाबत आमचे संबंधित अधिकारी तपास करत आहेत. त्यांच्याकडून अहवाल आला की दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. क्रिकेट मालिकेचे यजमान म्हणून आम्ही भारतीय संघातील खेळाडूंची बिनशर्त माफी मागतो. घडलेल्या प्रकाराचा सखोल तपास केला जाईल याची आम्ही खात्री देतो”, असं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.