ऑस्ट्रेलियचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर याला नुकतंच अ‍ॅलन बॉर्डर पुरस्काराने सन्मानित करत २०१९ मधील सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. बॉल टॅम्परिंग स्कॅण्डलमुळे डेव्हिड वॉर्नरने एक वर्षाच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केलं होतं. २०१९ वर्ल्ड कपमध्ये डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलिया संघाकडून सर्वाधिक धावांचा विक्रम केला होता. डेव्हिड वॉर्नरने सर्वच फॉरमॅटमध्ये आपली दमदार कामगिरी वर्षभर सुरु ठेवली होती.

डेव्हिड वॉर्नरने आपला सहकारी खेळाडू स्टिव्ह स्मिथचा फक्त एका मताने पराभव करत सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन खेळाडूचा किताब पटकावला. डेव्हिड वॉर्नरने आतपर्यंत तीन वेळा हा पुरस्कार पटकावला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर केलेल्या भाषणात डेव्हिड वॉर्नर भावूक झालेला पहायला मिळाला.

यावेळी बोलताना डेव्हिड वॉर्नरने सांगितलं की, “मला माहिती आहे, याआधी मी तुम्हाला निराश केलं आहे. महत्वाच्या स्पर्धांमध्ये संधी न मिळणं हे कोणत्याही खेळाडूसाठी निराशाजनक असतं. पण यानंतरही पुनरागमन करणं हे नक्कीच आशादायक आहे. अ‍ॅशेस मालिका जिंकणं ही आमच्या संघासाठी सर्वोत्तम गोष्ट होती, या मालिकेत मला हवीतशी कामगिरी करता आली नाही, ज्याच्यासाठी मी माफी मागितली आहे. पण अजुनही माझ्यात धडाकेबाज पुनरागमन करण्यासाठीची भूक कायम आहे. संघासाठी जे काही करावं लागेल ते मी करेनच”.

यावेळी डेव्हिड वॉर्नरने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचादेखील उल्लेख केला. घरात क्रिकेट खेळत असताना आपल्या मुली नेहमी विराट कोहलीचं नाव घेत असतात असं यावेळी डेव्हिड वॉर्नरने सांगितलं. क्रिकेपासून दूर राहणं फारच त्रास देणारं होतं असं सांगताना पुनरागन केल्यानंतर आपल्या खेळीने चाहत्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू पाहिल्यानंतर बरं वाटतं अशी भावना त्याने व्यक्त केली.