इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आकर्षक बोलींबाबत ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू अतिशय भावनिक असतात. याच भीतीपोटी विशिष्ट कालावधीत ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू कर्णधार विराट कोहलीसह भारतीय संघाला चिथावत नाही. त्याऐवजी त्यांना खूश राखतात, असा गौप्यस्फोट माजी कर्णधार मायकेल क्लार्कने करून क्रिकेटक्षेत्रात खळबळ माजवली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेटच्या मैदानावरील हाडवैर सर्वश्रुतच आहे. परंतु गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंचा दृष्टिकोन बदलला आहे. एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या ‘आयपीएल’चे ठोकताळे मांडूनच ते मैदानावर उतरतात, असा गंभीर आरोप क्लार्कने केला आहे.

‘‘भारत ही क्रिकेटमधील आर्थिक महासत्ता आहे, हे कुणीच नाकारू शकणार नाही. यात ‘आयपीएल’ महत्त्वाचे ठरते. परंतु ‘आयपीएल’ नजीक येताच ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आणि कदाचित अन्य देशांच्या क्रिकेटपटूंचेही भारतीय संघाविरुद्ध खेळतानाचे वागणे बदलते. एप्रिल महिन्यात कोहलीच्या संघातील खेळाडूंच्या साथीनेच खेळायचे असल्याने त्यांची देहबोलीच बदलते,’’ असे विश्लेषण ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार क्लार्कने केले आहे.

‘‘ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंच्या वागण्यातील ही तडजोड ‘आयपीएल’च्या लिलावात अव्वल १० क्रमांकांमध्ये स्थान मिळवण्यासाठी असते. त्यामुळेच कोहली याला ते कधीच चिथावत नाहीत. कारण ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट ‘आयपीएल’आधीच्या काही महिन्यांत बदलले असते. त्यांच्यातील कणखरपणा सौम्य होतो,’’ अशी टिप्पणी क्लार्कने के ली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैदानावरील सामन्यांचा इतिहास  २००८मधील ‘मंकी गेट’ प्रकरणासह अनेक वादांनी गाजला आहे.