फॉम्र्युला-वन विश्वातील महान शर्यतपटू सर जॅक ब्राभम यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. आपल्या अतुलनीय कामगिरीसह फॉम्र्युला-वन विश्वातील परिपक्व शर्यतपटू होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांनी तीन वेळा जागतिक ड्रायव्हर्स अजिंक्यपदावर कब्जा केला. स्वत: निर्मिलेल्या गाडीतून शर्यत पूर्ण करून जिंकण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर आहे. मोटारस्पोर्ट्स खेळाला त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानासाठी त्यांना सर किताबाने गौरवण्यात आले. कुपर रेसिंग संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी १९५९ आणि १९६० मध्ये ड्रायव्हर्स अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले तर ब्राभम कारसह त्यांनी १९६६ जेतेपदावर नाव कोरले होते. ‘ब्लॅक जॅक’ या टोपण नावाने ते प्रसिद्ध होते. रॉयल ऑस्ट्रेलियन हवाई दलात ते कार्यरत होते.