आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजीत स्वतःचं नाव मोठं करणारी फार कमी नावं आपल्याला माहिती असतील. सध्याच्या पिढीत शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन यांची नावं फिरकीपटूंच्या यादीत आदराने घेतली जातात. ९० च्या दशकात लेगस्पिन गोलंदाजीचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा शेन वॉर्न कुलदीप यादवच्या प्रेमात पडलाय. आगामी काळात कुलदीप यादव पाकिस्तानच्या यासिर शहाला मागे टाकेल असं भाकीत शेन वॉर्नने वर्तवलं आहे. यासिर शहाने नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० बळी घेणारा फिरकीपटू हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

अवश्य वाचा – कसोटी क्रिकेटमधला ‘हा’ विक्रम आता पाकिस्तानच्या यासिर शहाच्या नावे

रविचंद्रन अश्विन, हरभजन सिंह, रविंद्र जाडेजा या फिरकीपटूंच्यात कुलदीप यादवने आपली वेगळी छाप सोडली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धर्मशाळा कसोटीत त्याने आपलं पदार्पण केलं होतं. या कसोटीतल्या कामगिरीनंतर कुलदीप सध्या आपल्याला मिळालेल्या संधीचं पुरेपूर सोनं करताना दिसतोय. नुकत्याच पार पडलेल्या वन-डे मालिकेत दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅटट्रीक घेतली होती. भारतात एका कार्यक्रमात कुलदीप आणि शेन वॉर्न यांची भेट झाली, यानंतर ट्विटरवर शेन वॉर्नने कुलदीपचं तोंडभरुन कौतुक केलं.

मात्र यासिर शहाशी केलेली तुलना पाकिस्तानी क्रीडा चाहत्यांना काही रुचली नाही. त्यांनी शेन वॉर्नच्या या निर्णयावर चांगलीच टीका केली.

ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी मालिकेसाठी भारतात आलेला असतानाही, शेन वॉर्नने कुलदीपची गोलंदाजी जवळून पाहिली होती. यादरम्यान शेन वॉर्नने कुलदीपला काही टिप्सही दिल्या. ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या मनात संभ्रम करण्याची कुलदीपची हातोटी शेन वॉर्नला चांगलीच आवडली होती.