सातव्यांदा ग्रॅण्डस्लॅम पटकावण्याचे सानिया मिर्झाचे स्वप्न रविवारी भंगले. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि क्रोएशियाच्या इव्हान डॉडीग या जोडीचा पराभव झाला आहे. कोलंबियाच्या ज्युआन सेबास्टियन कॅबल आणि अमेरिकेची अॅबिगेल स्पीअर्स  या जोडीने सानिया – डॉडीग या जोडीचा ६-४, ६-४ ने पराभव केला. नवख्या जोडीने अव्वल सीडेड जोडीचा पराभव करत धक्कादाय विजयाची नोंद केली आहे.

उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या समांथा स्टोसूर आणि सॅम ग्रोथ जोडीवर ६-४, २-६, १०-५ असा विजय मिळवत सानिया – डॉडीग ही जोडी फायनलमध्ये पोहोचली होती. फायनलमध्ये सानिया – डॉ़डीगसमोर सेबास्टियन कॅबल आणि अमेरिकेची अॅबिगेल स्पीअर्स या जोडीचे आव्हान होते.
फायनलमध्ये सानिया – डॉडीग जोडीची सुरुवात अत्यंत निराशाजनक होती. या जोडीने पहिल्या सेटमध्ये चारही गेम गमावले. यानंतर त्यांनी पुनरागमन केले पण कॅबल- स्पीअर्स या जोडीवर मात करण्यात त्यांना अपयश आले. दुस-या सेटमध्येही सानिया – डॉडीगची परिस्थिती बिकट होती. अनुभवाच्या जोरावर या जोडीने प्रतिस्पर्ध्यांना विजयासाठी झुंजवले. दुस-या सेटमध्येही या जोडीला ६- ४ ने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे सानियाचे सातव्यांदा ग्रॅण्डस्लॅम पटकावण्याचे स्वप्न भंगले आहे. या पराभवामुळे सानिया – डॉडीग या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. माझा विजय मी माझ्या आईला समर्पित करते अशी भावनिक प्रतिक्रिया स्पीअर्सने दिली आहे.

सानियाच्या खात्यात मिश्र दुहेरीची तीन ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदं जमा आहेत. २०१४ साली सानियाने ब्राझीलच्या ब्रुनो सोअर्सच्या साथीने अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. मागील वर्षी सानियाला फ्रेंच ओपन स्पर्धा देखील जिंकण्याची संधी होती. पण सानियाला लिएण्डर पेस-मार्टिना हिंगीस जोडीसमोर पराभव स्विकारावाला लागला होता.