बिगरमानांकित टेनिसपटूंकडून पराभूत; फेडरर, जोकोविचची आगेकूच

ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत चौथ्या दिवशी पुरुष एकेरीमध्ये अव्वल दहा मानांकित टेनिसपटूंपैकी दोघांचे आव्हान संपुष्टात आले. त्यात सातवा मानांकित बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनसह स्वित्र्झलडचा माजी विजेता स्टॅनिस्लास वाविरकाचा समावेश आहे. स्वित्र्झलडचा रॉजर फेडरर व सर्बियाचा नोव्हाक जोकोविच या  टेनिसपटूंनी मात्र आगेकूच केली.

२०१४मध्ये मेलबर्नवर चषक उंचावलेल्या वाविरकाला अमेरिकेच्या बिगरमानांकित टेनिस सँडग्रेनकडून गुरुवारी २-६, १-६, ४-६ असे पराभूत व्हावे लागले. सँडग्रेन हा जागतिक क्रमवारीमध्ये ९७व्या स्थानावर आहे. त्याने एकूण पाच वेळा वाविरकाची सव्‍‌र्हिस भेदली. दुसऱ्या सेटमध्ये वाविरकाला केवळ एकच गेम जिंकता आला. जर्मनीच्या मॅक्सिमिलियन मॅर्टेरेरने दुसऱ्या फेरीमध्ये स्पेनच्या अनुभवी फर्नाडो वेर्डास्कोवर चुरशीच्या लढतीमध्ये ६-४, ४-६ ७-६(५), ३-६, ६-३ अशी मात केली.

वाविरकाप्रमाणे डेव्हिड गॉफिनलाही दुसऱ्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. त्याला फ्रान्सच्या ज्युलियन बेनीटय़ूने १-६, ७-६(५), ६-१, ७-६(४) असे हरवले. जवळपास तीन तास चाललेल्या लढतीमध्ये पहिला सेट सहज गमावूनही बेनिटय़ूने पुढील तीन सेट जिंकत त्याने सवरेत्कृष्ट विजयाची नोंद केली. १३व्या मानांकित अमेरिकेच्या सॅम क्वेरीही दुसऱ्या फेरीत गारद झाला.

दुसऱ्या फेरीच्या अन्य लढतींमध्ये स्वित्र्झलडच्या द्वितीय मानांकित रॉजर फेडररने सवरेत्कृष्ट खेळ करताना बिगरमानांकित जर्मनीच्या जॅन-लीओनार्ड स्ट्रफवर एकतर्फी लढतीमध्ये ६-४, ६-४, ७-६(४) अशी सहज मात केली. १४वा मानांकित नोव्हाक जोकोविचने तिसरी फेरी गाठली, तरी फ्रान्सच्या गेल मॉनफिल्सविरुद्ध त्याला घाम गाळावा लागला. पावणेतीन तास चाललेल्या लढतीमध्ये पहिला सेट गमावूनही जोकोविचने ४-६, ६-३, ६-१, ६-३ असा विजय मिळवला. ऑस्ट्रियाच्या पाचव्या मानांकित डॉमिनिक थिएमला बिगरमानांकित अमेरिकेच्या डेनिस कुडलाने त्याला ६-७(८), ३-६, ६-३, ६-२, ६-३ असे झुंजवले.

दिवसभरातील अन्य सामन्यांत चौथा मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव (जर्मनी), १२वा मानांकित हुआन मार्टिन डेल पोट्रो (अर्जेटिना), १९वा मानांकित टोमास बर्डिच (चेक प्रजासत्ताक), २९वा मानांकित रिचर्ड गॅस्केटने (फ्रान्स) तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

खेळेन किंवा नाही, हे माहीत नसूनही ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत सहभागाचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य होता, असे मला वाटते. दुखापतीतून पूर्णपणे सावरलो नाही, हे मला पराभवातून कळून चुकले. माझा खेळही अपेक्षेप्रमाणे उंचावला नाही.    –  स्टॅनिस्लास वाविरका

मेलबर्न पार्कवर पारा ४० अंशावर

मेलबर्न पार्कवरील तापमान ४० अंशावर गेल्याने टेनिसपटू हवालदिल झाले. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा तापमान सातत्याने वाढताना दिसत आहे. चार दिवसांमध्ये एकदा तापमान २० अंश सेल्सियस इतके होते. त्यानंतर ४० अंशावर गेले. निखाऱ्यांवर खेळत असल्यासारखे वाटल्याचे टेनिसपटू कॅरोलिन गॅर्सियाने म्हटले. डॉमिनिक थिएमने सामना संपल्यानंतर बर्फाच्या पाण्याने आंघोळ केली. गॅर्बिन मुगुरुझालाही उन्हाच्या काहिलीचा त्रास जाणवला. तिनेही सामन्यादरम्यान बर्फाच्या उपचाराचा आधार घेतला.

मुगुरुझा, कोन्टाचे आव्हान संपुष्टात

तिसरी मानांकित आणि विम्बल्डन विजेती स्पेनची गॅर्बिन मुगुरुझा आणि ब्रिटनची नववी मानांकित योहान्ना कोन्टा यांचे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील आव्हान दुसऱ्या फेरीमध्ये संपुष्टात आले.

मुगुरुझाने तैवानच्या बिगरमानांकित शे सू-वेईकडून ७-६(१), ६-४ अशी सरळ सेटमध्ये हार पत्करली. वेईने दोन तास चाललेला सामना एकहाती जिंकला. जागतिक क्रमवारीमध्ये ८८व्या स्थानी असलेल्या अननुभवी वेईने मुगुरुझावर वर्चस्व राखले. तिसऱ्या फेरीत तिची गाठ २६व्या मानांकित पोलंडच्या अग्न्स्झ्किा रॅडवॅन्स्काशी पडेल. कोन्टाचा अमेरिकेच्या बर्नार्डा पेराविरुद्ध टिकाव लागला नाही. सरळ सेटमध्ये ती ४-६, ५-७ अशी पराभूत झाली.

दमदार पुनगरागमन करणाऱ्या रशियाच्या मारिया शारापोव्हाने दुसऱ्या फेरीत १४व्या मानांकित लॅटव्हियाच्या अ‍ॅनास्तासिजा सेवास्टोव्हावर ६-१, ७-६(४) असा विजय मिळवला. माजी विजेती शारापोव्हासमोर तिसऱ्या फेरीत आणखी एक माजी विजेती, २१वी मानांकित जर्मनीच्या अँजेलिक कर्बरचे आव्हान आहे. दुसऱ्या फेरीत तिने क्रोएशियाच्या डोना वेकिकवर ६-४, ६-१ अशी मात केली.

रोमानियाच्या अव्वल मानांकित सिमोना हॅलेपने तिसरी फेरी गाठताना कॅनडाच्या युगेनी बुशार्डवर ६-२, ६-२ असा सहज विजय मिळवला. फ्रान्सच्या आठव्या मानांकित कॅरोलिन गॅर्सियाने दुसऱ्या फेरीचा अडथळा पार केला तरी चेक प्रजासत्ताकच्या मॅर्केटा वॉन्ड्रॉउसोवाने तिला ६-३(७), ६-२, ८-६ असे झुंजवले. चेक प्रजासत्ताकची सहावी मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा आणि अमेरिकेची १७वी मानांकित मॅडिसन कीज यांनी तिसरी फेरी गाठली.

शे सू-वेईविरुद्ध माझा खेळ तितका वाईट झाला नसला तरी ती विजयासाठी पात्र आहे.    – गॅर्बिन मुगुरुझा