विजेतेपदाच्या दावेदार असलेल्या सिमोना हॅलेप व मेडिसन कीज यांनी ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. माजी विजेत्या अँजेलिक कर्बरने सुइ वेइ हिसेहविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवत आगेकूच केली. आठव्या मानांकित कॅरोलिन गार्सियाला पराभव पत्करावा लागला.

अग्रमानांकित हॅलेपने जपानच्या नाओमी ओसाकावर ६-३, ६-२ असा सफाईदार विजय मिळवला. अमेरिकेचे आशास्थान असलेल्या कीजने फ्रान्सची खेळाडू गार्सिया हिला ६-३, ६-२ असे सरळ दोन सेटमध्ये निष्प्रभ केले. २२ वर्षीय खेळाडू कीजने हा सामना एक तास आठ मिनिटांमध्ये जिंकला. गतवर्षी तिने अमेरिकन खुल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. ज्येष्ठ टेनिसपटू लिंडसे डेव्हनपोर्ट यांचे मार्गदर्शन कीजला मिळत आहे.

कर्बरने अटीतटीच्या लढतीत हिसेहचा ४-६, ७-५, ६-२ असा पराभव केला. पराभवाच्या छायेतून तिने हा सामना जिंकला. पहिला सेट गमावल्यानंतर तिला सूर सापडला. दुसऱ्या सेटमध्येही ती अडचणीत सापडली होती. मात्र जिद्दीने खेळ करीत तिने विजयश्री खेचून आणली. हिसेहने चौथ्या फेरीत स्थान मिळविण्यापूर्वी गॅर्बिन मुगुरुझा व अग्निस्झ्का रॅडवॅन्स्का यांच्यावर सनसनाटी विजय मिळवला होता.

हॅलेपला ओसाकाविरुद्ध सामना जिंकताना फारसे कष्ट पडले नाहीत. एक तास १९ मिनिटांमध्ये तिने विजय मिळवला. तिने दोन्ही सेटमध्ये क्रॉसकोर्ट फटक्यांचा बहारदार खेळ केला. तिने बॅकहँड फटक्यांचाही कल्पकतेने उपयोग केला.

चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. तिने आपलीच सहकारी बार्बरा स्ट्रायकोवाचा ६-७ (५-७), ६-३, ६-२ असा पराभव केला. स्ट्रायकोवाने पहिला सेट जिंकून चांगली सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये प्लिस्कोवाला सूर गवसला. हा सामना दोन तास ४१ मिनिटे चालला होता.

हिसेहकडे उत्तम नैपुण्य

‘‘मुगुरुझा व रॅडवॅन्स्का यांच्यावर मात करणे, ही काही सोपी गोष्ट नाही. हिसेहने या दोन्ही खेळाडूंना गारद करत सर्वाना आश्चर्यचकित केले. मलादेखीलविरुद्ध खूपच झगडावे लागले. तिच्याकडे अव्वल स्थान मिळवण्याची क्षमता आहे. मैदानावरील तिचा चतुरस्र खेळ खरोखरीच थक्क करणारा होता. दुसऱ्या सेटमध्ये तिच्याकडून झालेल्या अक्षम्य चुकांचा मला फायदा मिळाला. अन्यथा मीदेखील पराभूत झाले असते,’’ असे अँजेलिक कर्बरने सांगितले.

लिंडसे डेव्हनपोर्ट यांच्या मार्गदर्शनामुळेच मला चांगले यश मिळवता आले. माझ्या सव्‍‌र्हिस अचूक झाल्या व परतीच्या फटक्यांवरही मी योग्य रीतीने नियंत्रण ठेवू शकले. अशीच वाटचाल यापुढेही ठेवण्याची मला खात्री आहे.

मेडिसन कीज