ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत आज एका धक्कादायक निकालाची नोंद करण्यात आली. ग्रीसच्या स्टेफानो त्सित्सिपास याने रॉजर फेडररचा ६-७, ७-६, ७-५, ७-६ पराभव केला आहे. लहान वयात त्याने अतिशय उत्तम कामगिरी करुन आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच ही मोठे यश मिळवले आहे. स्टेफानो याचा रॉजर फेडरर हा लहानपणापासूनचा आवडता खेळाडू आणि हिरो आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत हरविण्याची कामगिरी ही स्टेफानोसाठी निश्चितच मोठी कामगिरी ठरली.

वयाच्या २० व्या वर्षी अशाप्रकारे फेडररसारख्या नामांकित खेळाडूला हरवणे ही मोठी कामगिरी समजली जातीये. या स्पर्धेतील यशामुळे स्टेफानो हा उपांत्यपूर्व फेरीत जाणारा ग्रीसचा पहिला खेळाडू ठरलाय. आतापर्यंत ग्रीसच्या महिला आणि पुरुष गटातील एकही खेळाडू उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला नव्हता. आता पुढील सामना कसा रंगतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत रॉजर फेडरर आणि स्टेफानो दोघेही पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले होते. या कामगिरीनंतर, ”मी जगातला सर्वात आनंदी व्यक्ती असून या भावना मी व्यक्त करु शकत नाही” असे स्टेफानो म्हणाला.