सर्बियाचा विख्यात टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत जोकोव्हिचने डॉमनिक थिएमवर ६-४, ४-६, २-६, ६-३, ६-४ अशा पाच सेट्समध्ये विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं जोकोव्हिचचं हे आठवं विजेतेपद ठरलं.

पहिल्या सेटमध्ये ६-४ ने बाजी मारत जोकोव्हिचने आपल्या लौकिकाला साजेशी सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये थिएमने केलेला खेळ हा कौतुकास्पद होता. जोकोव्हिचवर पूर्णपणे सरशी मिळवत थिएमन सलग दोन सेट जिंकत सामन्यात आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये जोकोव्हीचने दमदार पुनरागमन करत सामन्यात बरोबरी साधली. अखेरच्या सेटमधघ्येही दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलीच झुंज रंगली होती. थिएमने आपल्या ठेवणीतल्या काही खास फटक्यांच्या जोरावर जोकोव्हिचला चांगलच सतावलं. मात्र सरतेशेवटी जोकोव्हिचने आपला सर्व अनुभव पणाला लावत विजेतेपदावर आपली मोहर उमटवली.

जोकोव्हिचचं हे १७ वं ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरलं. रॉजर फेडररच्या २० ग्रँडस्लॅम विजेतेपदांशी बरोबरी करण्यासाठी जोकोव्हिचला केवळ ३ विजेतेपदं हवी आहेत.