अनुभवी टेनिसपटू रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आपला अनुभव पणाला लावत फेडररने २८ वर्षीय टेनीस सँडग्रेनची झुंज ६-३, २-६, २-६, ७-६ (१०-८), ६-३ च्या फरकाने मोडून काढली. साडेतीन तास सुरु असलेल्या सामन्यात फेडररला विजयासाठी संघर्ष करावा लागला, पण अखेरीस त्याने ही किमया साधून दाखवली.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फेडररने पहिला सेट सहज खिशात घातला. मात्र २८ वर्षीय अमेरिकन प्रतिस्पर्ध्याने पुढील दोन सेटमध्ये दणक्यात पुनरागमन करत फेडररला धक्का दिला. पिछाडीवर पडलेला फेडरर चौथ्या सेटमध्ये पुनरागमन करेल असं वाटत होतं, मात्र या सेटमध्येही सँडग्रेनने चांगलीच झुंज दिली. टायब्रेकरमध्येही सँडग्रेनकडे मोठी आघाडी होती, मात्र फेडररने हार न मानता सेट जिंकत बाजी मारली.

फेडररने दाखवलेल्या लढाऊ बाण्यामुळे सँडग्रेनचा आत्मविश्वास खचलेला पहायला मिळाला. तब्बल ७ मॅच पॉईंट वाचवत फेडररने आपलं आव्हान कायम राखलं. यामुळे अखेरच्या सेटमध्ये सँडग्रेनचा फॉर्म हरवलेला पहायला मिळाला. अखेरीस फेडररने ६-३ च्या फरकाने अखेरचा सेट जिंकत सामन्यात बाजी मारली.