ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटाच्या विजेतेपदासाठी चीनची ली ना आणि स्लोव्हाकियाची डॉमिनिका सिबूलकोव्हा यांच्यात लढत होणार आहे.
या दोघींनी आज(गुरूवार) आपापल्या उपांत्य फेरीत प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे.
यातील चीनची ली ना गेल्या चार वर्षांपासून ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करत आहे. ली ना हिने कॅनडाच्या इग्वेनी बाऊचार्डचा ६-२, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
दुसऱया बाजूला गतविजेती व्हिक्टोरिया अझारेन्काचा पराभव करणाऱया ऍग्नीस्का रॅडवन्स्का हिचा सिबुलकोव्हाने ६-१, ६-२ असा सहज पराभव केला. सिबुलकोव्हाने यावेळी ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच प्रवेश मिळविला आहे. सिबुलकोव्हा आणि ऍग्नीस्का रॅडवन्स्का यांचा उपांत्यफेरी सामनाही धक्कादायक निकाल देणारा ठरला आहे. जागतिक क्रमवारित स्वत:हून काही क्रमांकांनी पुढच्या स्थानी असलेल्या ऍग्नीस्का रॅडवन्स्का हिला सिबुलकोव्हाने एकही संधी न देता अवघ्या ७० मिनिटांत विजय प्राप्त केला. त्यामुळे सिबुलकोव्हाला यावेळीच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या जेतेपदाचा दमदाम दावेदार मानले जात आहे. दोन्हीही स्पर्धक झुंझार खेळी करणारे असल्याचे अंतिम सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.