स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत पाचव्यांदा धडक मारली. तृतीय मानांकित रॉजर फेडरर याला पराभूत करणाऱ्या स्टेफानो त्सित्सिपास याच्यावर नदालने ६-२, ६-४, ६-० असा एकतर्फी विजय मिळवला. ग्रीसच्या स्टेफानो त्सित्सिपास याने रॉजर फेडररचा ६-७, ७-६, ७-५, ७-६ पराभव केला होता. त्यामुळे नदाललादेखील तो निकराची झुंज देईल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र तसे काही घडले नाही. नदालने अतिशय सहजपणे हा सामना खिशात घातला आणि आपल्या २५ व्या ग्रँडस्लॅम फायनलमध्ये धडक मारली.

नदालने दुखापतीतून सावरल्यानंतर या स्पर्धेतून पुनरागमन केले. आजचा सामना सुमारे १ तास आणि ४६ मिनिटे चालला. नदालने पहिला सेट ६-२ असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये त्सित्सिपासने जोरदार झुंज दिली. तो सेट त्याला ६-४ असा गमवावा लागला. तिसऱ्या सेटमध्येही चांगली झुंज पाहायला मिळेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण हा सेट मात्र ६-० असा नदालने जिंकला आणि १८वे ग्रँड स्लॅम मिळवण्याच्या आणखी जवळ पोहोचला.

दरम्यान, तरुण पिढी ही अत्यंत उत्तम कामगिरी करत आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही संदेशाची गरज नाही, असे मतही नदालने व्यक्त केले.