सध्या टेनिस जगतातील प्रतिष्ठेची समजली जाणारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सुरु आहे. वर्षभरात होणाऱ्या ४ ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी ही १ स्पर्धा असते. वर्षाच्या सुरुवातीलाच ही स्पर्धा खेळण्यात येते. सध्या सुरु असलेल्या स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहेत. मात्र क्रिकेट जगतातील चाहत्यांमध्ये या स्पर्धेची चर्चा एका वेगळ्याच कारणासाठी रंगली आहे. ते कारण म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिनने ट्विट केलेले आपले फोटो…

सर्वत्र १० वर्ष जुने फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड सुरु असताना सचिनने आपले काही फोटो ट्विट केले आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सुरु असताना त्याने आपल्या जुन्या आठवणींना ट्विटरच्या माध्यमातून उजाळा दिला आहे. सचिनने अगदी तरुण असतानाचे दोन फोटो ट्विट केले आहेत. आणि त्याबरोबरच एक झकास कॅप्शनदेखील लिहिले आहे. ‘मला खेळण्यापासून काहीही थांबवू शकत नाही. मी पायात बूट घातले नसतील, तरीही मी खेळतोच’ असे त्याने ट्विटला कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहेत. टेनिसचा ‘राजा’ रॉजर फेडरर आणि टेनिसची ‘राणी’ सेरेना विल्यम्स यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर नोव्हाक जोकोव्हिच, राफेल नदाल हे अग्रगण्य खेळाडू अजूनही स्पर्धेत तग धरून आहेत.