ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या जेतेपदावरील रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच यांची सद्दी मोडण्याच्या दिशेने स्वित्र्झलडच्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत चेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डीचवर ६-३, ६-७(१), ७-६(३), ७-६(४) अशी मात करत वॉवरिन्काने कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला. अंतिम फेरीत रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या महामुकाबल्यातील विजेत्याशी वॉवरिन्काची लढत होणार आहे.

आठव्या मानांकित वॉवरिन्काने या चुरशीच्या लढतीत मोक्याच्या क्षणी अचूक सव्‍‌र्हिसवर भर देत सरशी साधली. ‘‘याक्षणी काय बोलावे मला सुचत नाही. मी नि:शब्द झालो आहे. हा क्षण अद्भूत आहे. प्रत्येक सामना जिंकण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतो आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठेन असा विचार केला नव्हता, आता प्रत्यक्षात अंतिम फेरीत प्रवेश केल्याने प्रचंड आनंद झाला आहे,’’ असे वॉवरिन्काने सांगितले.

अव्वल मानांकित खेळाडूंना चीतपट करणाऱ्याची किमया साधणाऱ्या चीनच्या लि ना आणि स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोव्हा यांच्यात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचा महिला गटाचा अंतिम मुकाबला रंगणार आहे. अंतिम लढत दोनदा खेळूनही जेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिलेल्या चीनच्या लि ना हिने उदयोन्मुख कॅनडाच्या एग्युेन बोऊचार्डचा ६-२, ६-४ असा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. २०व्या मानांकित डॉमिनिका सिबुलकोव्हाने पाचव्या मानांकित अ‍ॅग्निझेस्का रडवानस्काला ६-१, ६-२ असे नमवत अंतिम फेरीत धडक मारली.
चौथ्या मानांकित लि नाने अनुभवाच्या जोरावर कॅनडाच्या ईग्वेनी बोऊचार्डचे आव्हान सहज संपुष्टात आणले. बेसलाइनवरून अफलातून खेळ करणाऱ्या लि नाने २-० अशी आघाडी घेतली. फोरहँड, बॅकहँड, ड्रॉप, स्लाइस अशा सगळ्या फटक्यांचा प्रभावी उपयोग करत लि नाने आघाडी ५-० अशी आघाडी वाढवली. बोऊचार्ड एक गुण कमावत टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर लि नाने पुन्हा जोरदार खेळ करत पहिला सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये ३-३ अशा बरोबरीनंतर लि नाने आपला खेळ उंचावत दुसऱ्या सेटसह सामना जिंकला.
‘‘अंतिम लढतीत मी तिसऱ्यांदा खेळणार आहे. त्यामुळे जेतेपदासाठी सर्वोत्तम खेळ करणार आहे. यावेळी खेळताना पडणार नाही याची काळजी घेणार आहे,’’ असे लि ना हिने सांगितले.
ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची सिबुलकोव्हाची ही पहिलीच वेळ असणार आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारी सिबुलकोव्हा स्लोव्हाकियाची पहिली खेळाडू ठरली आहे. पहिल्या सेटमध्ये सिबुलकोव्हाने ४-१ अशी आघाडी घेतली. रडवानस्काच्या हातून झालेल्या दुहेरी चुकांचा पुरेपूर फायदा उठवत सिबुलकोव्हाने पहिला सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्येही सिबुलकोव्हाने वर्चस्व राखले. रडवानस्काला आपल्या लौकिकाला साजेशा खेळ करता आला नाही आणि सिबुलकोव्हाने ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.


सानिया-टेकाऊ उपांत्य फेरीत
मेलबर्न : सानिया मिर्झा आणि तिचा रोमानियाचा साथीदार होरिआ टेकाऊ जोडीने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आगेकूच केली. मात्र लिएण्डर पेसला पराभवाला सामोरे जावे लागल्याने मिश्र दुहेरीत भारतीय खेळाडूंमध्ये होणाऱ्या मुकाबल्याची शक्यता मावळली आहे. सहाव्या मानांकित सानिया-टेकाऊ जोडीने बिगरमानांकित ऐसाम उल हक कुरेशी आणि ज्युलिया जॉर्जस जोडीवर ६-३, ६-४ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत या जोडीचा मुकाबला ऑस्ट्रेलियाच्या जर्मिला गाजडोसोव्हा आणि मॅथ्यू एबडेनशी होणार आहे. दुसऱ्या लढतीत फ्रान्सच्या क्रिस्तिना म्लाडेनओव्हिक आणि कॅनडाच्या डॅनियल नेस्टर जोडीने लिएण्डर पेस आणि स्लोव्हेकियाच्या डॅनियला हन्तुचोव्हा जोडीवर ६-३, ६-३ अशी मात केली. पुरुष एकेरी, महिला आणि पुरुष दुहेरी या प्रकारांमध्ये भारताचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे.