कारकीर्दीतील १८वे ग्रँडस्लॅम विजेतेपद

मेलबर्न पार्कवर पुन्हा एकदा गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचचीच सत्ता दिसून आली. जोकोव्हिचने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा सरळ तीन सेटमध्ये सहज धुव्वा उडवून ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले. जोकोव्हिचचे हे कारकीर्दीतील १८वे तर ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे नववे जेतेपद ठरले.

जोकोव्हिचने आपल्या दमदार सर्व्हिसच्या बळावर तसेच जमिनीलगतचे फटक्यांवर प्रभुत्व गाजवत मेदवेदेवचे आव्हान परतवून लावले. जोकोव्हिचने अखेरीस १३पैकी ११ गेम जिंकले. त्यामुळे त्याने ७-५, ६-२, ६-२ अशा दमदार विजयासह जेतेपद आपल्या नावावर केले. मेलबर्न पार्कवरील त्याचे हे सलग तिसरे जेतेपद ठरले.

जोकोव्हिचने गेल्या १०पैकी सहा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून ८ मार्चपर्यंत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर शिक्कामोर्तब केले आहे. कारकीर्दीत दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या चौथ्या मानांकित मेदवेदेवला मात्र या वेळीही जेतेपदाचे स्वप्न साकार करता आले नाही. यासह जोकोव्हिचने मेदवेदेवची सलग २० सामन्यांची विजयाची मालिका खंडित केली.

जोकोव्हिचने पहिल्या १० मिनिटांतच ३-० अशी आघाडी घेतली होती. पण मेदवेदेवने त्याला कडवी लढत देत चांगलेच झुंजवले. ६-५ अशी स्थितीतून जोकोव्हिचने तीन सेटपॉइंट मिळवले होते. पण तिसऱ्या प्रयत्नांत मेदवेदेवचा फटका नेटवर आदळल्याने जोकोव्हिचने पहिला सेट आपल्या नावावर केला.

दुसऱ्या सेटच्या पहिल्याच गेममध्ये मेदवेदेवने जोकोव्हिचची सव्र्हिस भेदत पुनरागमन केले. पण जोकोव्हिचने त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देत पुढील चार गेम जिंकत दुसऱ्या सेटवर वर्चस्व प्रस्थापित केले. तिसऱ्या सेटमध्येही जोकोव्हिचचाच बोलबाला पाहायला मिळाला. आपल्या बॅकहँड आणि परतीच्या फटक्यांच्या जोरावर जोकोव्हिचने वर्चस्व गाजवले.

पोलासेक-डॉगिगला पुरुष दुहेरीचे जेतेपद

फिलिप पोलासेक आणि इव्हान डॉगिग या जोडीने गेल्या वर्षीच्या विजेत्या राजीव राम आणि जो सालिस्बरी जोडीवर मात करत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. पोलासेक-डॉगिग जोडीने ही लढत ६-३, ६-४ अशी सहज जिंकत जेतेपदावर नाव कोरले.

३११ जागतिक क्रमवारीत ३११ आठवडे अग्रस्थानी राहून जोकोव्हिचने रॉजर फेडररचा विक्रम मोडीत काढला आहे.

१८जोकोव्हिचने कारकीर्दीत १८ ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याची करामत रविवारी केली. त्याने ऑस्ट्रेलियन स्पर्धेची नऊ, विम्बल्डनची पाच तसेच अमेरिकन स्पर्धेची तीन आणि फ्रेंच स्पर्धेचे एक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले आहे.

६वयाची तिशी ओलांडल्यानंतर सहा ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावण्याच्या नदालच्या विक्रमाशी त्याने बरोबरी साधली. मार्च २०१७मध्ये ३०वा वाढदिवस साजरा केल्यानंतर जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन स्पर्धेची तीन, विम्बल्डनची दोन तर अमेरिकन स्पर्धेचे एक जेतेपद मिळवले आहे.

सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांचे मानकरी

  • रॉजर फेडरर    २०
  • राफेल नदाल   २०
  • नोव्हाक जोकोव्हिच     १८
  • पीट सॅम्प्रास              १४

उदयास आलेली नवी पिढी आमच्यासारख्यांवर वर्चस्व गाजवेल, अशी चर्चा सगळीकडे आहे, पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. चांगला खेळ करणाऱ्यालाच विजय मिळवता येतो. कठोर परिश्रम घेणाऱ्या प्रत्येकाचा मी सन्मान राखतो. मेदवेदेव हा खडतर प्रतिस्पर्धी आहे. आणखी काही वर्षांनी मी त्याची स्तुती नक्कीच करेन. ही स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. – नोव्हाक जोकोव्हिच