व्हीनस विल्यम्स आणि अमेरिकन विजेती स्लोएनी स्टीफन्स यांना ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागल्यामुळे अमेरिकेच्या आव्हानाला जोरदार धक्का बसला आहे.

गतविजेत्या सेरेना विल्यम्सच्या अनुपस्थितीत विजेतेपदासाठी उत्सुक असलेली तिची मोठी बहीण व्हीनसला पहिल्याच सामन्यात स्वित्र्झलडच्या बेलिंडा बेन्किकने ६-३, ७-५ असे पराभूत केले. गतवर्षी या स्पध्रेच्या अंतिम फेरीत व्हीनसला सेरेनाने पराभूत केले होते.

स्पर्धेचा पहिला दिवस अनपेक्षित निकालांचा ठरला. १०वी मानांकित कोको व्हेंडेवेगे, सवरेत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूचा मान मिळवणारी सिसी बेलीस यांनाही पहिल्या फेरीतच बाद व्हावे लागले.

२० वर्षीय बेन्किकने पाच वेळा सव्‍‌र्हिसब्रेक वाचवला. पावसामुळे व्यत्यय निर्माण झालेल्या या लढतीत तिने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ केला. अनुभवी खेळाडू व्हीनसपेक्षा तिची चपळता हेच या लढतीचे वैशिष्टय़ ठरले. प्रेक्षकांचा पाठिंबा तिच्यासाठी फायदेशीर ठरला. अन्य लढतीत चीनच्या झांग शुईने स्टीफन्सवर २-६, ७-६ (७-२), ६-२ अशी मात केली. दुसऱ्या सेटमधील दहाव्या गेमच्या वेळी सव्‍‌र्हिसवर सामना जिंकण्याची संधी स्टीफन्सला मिळाली होती; परंतु तिने सव्‍‌र्हिसच्या चुका करीत हा गेम गमावला. त्यानंतर शुईने सामन्यावर नियंत्रण मिळवत विजयश्री खेचून आणली. तिमिआ बाबोसने व्हेंडेवेगेवर ७-६ (७-४), ६-२ अशी मात केली.

फ्रेंच विजेत्या येलेना ओस्तापेन्कोने ३७ वर्षीय फ्रान्सेस्का शियाव्होनचा ६-१, ६-४ असा पराभव केला. ‘‘शियाव्होन ही अतिशय अनुभवी खेळाडू असल्यामुळे तिच्यावर मात करणे सोपे नव्हते. त्यामुळेच मी या सामन्यापूर्वी भरपूर गृहपाठ केला होता. त्याचाच फायदा मला प्रत्यक्ष लढतीचे वेळी झाला,’’ असे ओस्तापेन्काने सांगितले.

बेन्किकविरुद्ध मला पराभव स्वीकारावा लागला असला तरी माझा खेळ खूप वाईट झाला नाही. अपेक्षेप्रमाणेच मी खेळले. माझ्यापेक्षा ती खूप तरुण असल्यामुळे मैदानावरील चापल्यच निर्णायक ठरले. रॉजर फेडररबरोबर बेन्किकने हॉपमन चषक स्पर्धेत भाग घेतला आहे. मैदानावर व मैदानाबाहेर कसे वर्तन ठेवले पाहिजे, हे तिने फेडररकडून शिकले आहे. त्याच्या मौलिक सूचनांचा तिला फायदा मिळाला आहे.

व्हीनस विल्यम्स

प्रामाणिकपणे सांगायचे तर व्हीनससारखी प्रतिस्पर्धी असल्याने ‘माझे दुर्दैव’ अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती. मात्र चांगल्या खेळाडूला हरवून आगेकूच केल्याचे समाधान वाटते.

बेलिंडा बेन्किक