पुरुषांमध्ये फेडरर, जोकोव्हिच आणि महिला एकेरीत सेरेना, ओसाका यांची दुसऱ्या फेरीत आगेकूच

अमेरिकेची किशोरवयीन टेनिसपटू कोरी गॉफने सोमवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत धक्कादायक विजयाची नोंद केली. १५ वर्षीय गॉफने अमेरिकेच्याच व्हीनस विल्यम्सला महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत धूळ चारली. याव्यतिरिक्त रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, सेरेना विल्यम्स आणि नाओमी ओसाका या नामांकित खेळाडूंनी विजयी सलामी देताना दुसरी फेरी गाठली.

मार्गारेट कोर्ट एरिना येथे झालेल्या महिला एकेरीच्या या सामन्यात गॉफने ३९ वर्षीय व्हीनसला ७-६ (७-५), ६-३ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. हा सामना १ तास आणि ३७ मिनिटे रंगला. गतवर्षी विम्बल्डनच्या पहिल्या फेरीतसुद्धा गॉफने व्हीनसला पराभवाचा धक्का दिला होता. दुसऱ्या फेरीत बिगरमानांकित गॉफचा रोमानियाच्या सोरोना क्रिस्टिआशी सामना होईल.

महिला एकेरीच्या अन्य सामन्यात जपानच्या गतविजेत्या नाओमी ओसाकाने मारिआ बोझाकोव्हाचा ६-२, ६-४ असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टीने लेसी त्सुरेन्कोवर ५-७, ६-१, ६-१ अशी मात केली. अमेरिकेच्या २३ ग्रँडस्लॅम विजेत्या आठव्या मानांकित सेरेनाने अनास्ताशिआ पोटापोव्हाचा ६-०, ६-३ असा सहज धुव्वा उडवला.

पुरुष एकेरीत स्वित्र्झलडच्या तिसऱ्या मानांकित फेडररने अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनला ६-३, ६-२, ६-२ असे नमवले. गतविजेत्या जोकोव्हिचला मात्र पहिल्याच लढतीत जर्मनीच्या लेनार्ड स्ट्रफवर विजय मिळवताना संघर्ष करावा लागला. २ तास आणि १६ मिनिटे रंगलेल्या सामन्यात दुसऱ्या मानांकित जोकोव्हिचने स्ट्रफला ७-६ (७-५), ६-२, २-६, १-६ असे चार सेटमध्ये नमवले. ग्रीसच्या सहाव्या मानांकित स्टीफानोस त्सित्सिपासने सॅल्व्हाटोर कारुसोला ६-०, ६-२, ६-३ असे पराभूत करून दुसऱ्या फेरीतील स्थान पक्के केले.

पावसामुळे प्रज्ञेशचा सामना लांबणीवर

भारताचा आघाडीचा टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनचा पहिल्या फेरीतील सामना पावसामुळे मंगळवारवर ढकलण्यात आला आहे. जपानच्या तात्सुमा इटोविरुद्ध प्रज्ञेशचा कोर्ट क्रमांक पाचवर सामना रंगणार होता. मात्र किमान १ तास वाट पाहूनही खेळ होणे शक्य नसल्यामुळे सामना पुढे ढकलण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दिवसभरातील ६४ पैकी एकूण १७ सामने पावसामुळे दुसऱ्या दिवशी खेळवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.