पुरुषांमध्ये नदाल, झ्वेरेव्ह आणि महिला एकेरीत हॅलेप, कर्बर यांचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

 

ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थीम आणि स्वित्र्झलडचा स्टॅनिस्लास वॉवरिंका यांनी गुरुवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत संघर्षपूर्ण विजयाची नोंद करून पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली. त्याशिवाय राफेल नदाल, अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह, सिमोना हॅलेप आणि अँजेलिक कर्बर यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर सहज मात करून विजयी घोडदौड कायम राखली.

मेलबर्न एरिना येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत पाचव्या मानांकित थीमने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स बोल्टला ६-२, ५-७, ६-७ (५-७), ६-१, ६-२ असे पराभूत केले. हा सामना ३ तास आणि ३२ मिनिटे रंगला, तर ३ तास आणि ३८ मिनिटे रंगलेल्या अन्य लढतीत १५व्या मानांकित वॉवरिंकाने आंद्रेस सिप्पीला ४-६, ७-५, ६-३, ३-६, ६-४ असे पाच सेटमध्ये नमवले. तिसऱ्या फेरीत थीमसमोर टेल फ्रिट्र्झचे आव्हान असेल, तर वॉवरिंकाची चिवट वृत्तीच्या जॉन इस्नरशी गाठ पडणार आहे.

जागतिक टेनिस क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या स्पेनच्या अग्रमानांकित नदालने फेड्रिको डेल्बोनिसचा ६-३, ७-६ (७-४), ६-१ असा पराभव केला. जर्मनीच्या सातव्या मानांकित झ्वेरेव्हने इगोर गॅरेसिमोव्हवर ७-६ (७-५), ६-४, ७-५ अशी सरशी साधली. याव्यतिरिक्त रशियाच्या डॅनिल मेद्वेदेव प्रेडो मार्टिनेझवर ७-५, ६-१, ६-३ असा विजय मिळवला.

महिला एकेरीत गतवर्षीच्या विम्बल्डन विजेत्या चौथ्या मानांकित हॅलेपने हॅरिएट डार्टचा ६-२, ६-४ असा सहज धुव्वा उडवला. हॅलेपसमोर पुढील फेरीत युलिया पुतिनसेव्हाचे आव्हान असेल. जर्मनीच्या १७व्या मानांकित कर्बरने प्रिसिला हॉनवर ६-२, ६-३ अशी मात केली. त्याशिवाय गर्बिन मुगुरुझाने अ‍ॅना तोमजॅनोव्हिचला ६-३, ३-६, ६-३ असे नामोहरम केले.

सानियाची महिला दुहेरीतूनसुद्धा माघार

भारताची दुहेरीतील अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झाने गुरुवारी महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतून अर्धवटच माघार घेतली. बुधवारीच पोटरीच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण येऊ नये, यामुळे सानियाने मिश्र दुहेरीतून माघार घेतली होती. महिला दुहेरीतूनसुद्धा सानियाला याच कारणामुळे स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. नाडिआ किचेनॉकच्या साथीने खेळणाऱ्या सानियाने हॅन झिनयुन आणि झू लिन यांच्याविरुद्ध पहिला सेट २-६ असा गमावला होता, तर दुसऱ्या सेटमध्येही सानिया-नाडिआ यांची जोडी ०-१ने पिछाडीवर होती. गेल्या आठवडय़ातच सानिया-नाडिआ यांनी होबार्ट टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.

वडिलांच्या निधनानंतरही ओस्तापेन्कोचा धाडसी निर्णय

लॅटवियाच्या जेलेना ओस्तापेन्कोला गुरुवारी महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी एक तास शिल्लक असतानाच वडिलांच्या निधनाची बातमी मिळाली; परंतु त्यानंतरही तिने स्पर्धेतून माघार न घेता सामना खेळण्याचा धाडसी निर्णय घेतल्यामुळे टेनिसविश्वातून तिच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. मात्र ओस्तापेन्कोला सहाव्या मानांकित बेलिंडा बेनकिककडून ५-७, ५-७ असा पराभव पत्करावा लागल्याने तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दरम्यान, मिश्र दुहेरीत जेलेना ओस्तापेन्को भारताच्या लिएण्डर पेसच्या साथीने खेळणार आहे. शनिवारी मिश्र दुहेरीच्या लढतींना प्रारंभ होणार असून रोहन बोपण्णा नाडिआ किचेनॉकसह उतरणार आहे.

मिलमॅनची कोर्ट बदलण्याची मागणी

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू जॉन मिलमॅनने रॉजर फेडररविरुद्ध शुक्रवारी रंगणाऱ्या तिसऱ्या फेरीतील सामन्यासाठी कोर्ट बदलण्याची मागणी आयोजकांकडे केली आहे. फेडररच्या सामन्यांना चाहते मोठय़ा प्रमाणावर गर्दी करतात, त्यामुळे त्याचे सामने नेहमी रॉड लेव्हर एरिनाच्या सेंटर कोर्टवर आयोजित करण्यात येतात. त्यामुळेच मिलमॅनने फेडररसाठीसुद्धा प्रतिकूल परिस्थिती निर्माण करावी, अशी मागणी त्याने केली आहे. ‘‘फेडररचे प्रत्येक सामने एकाच कोर्टवर खेळवण्यात येतात. त्यामुळे त्याला त्या कोर्टवर कोणत्या दिशेने वारा येईल अथवा कोणत्या बाजूने सव्‍‌र्हिस उत्तम होईल, याची पूर्ण जाणीव असते. त्याउलट फेडररच्या प्रतिस्पध्र्याना मात्र या सर्व गोष्टींशी मेळ घालेपर्यंतच वेळ गेलेली असते. त्यामुळे फेडररसाठीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण करावी,’’ असे मिलमॅन म्हणाला.

आता आव्हान चिखलाचे

वणव्यामुळे प्रदूषित हवा, अवकाळी पाऊस यांसारख्या असंख्य आव्हानांवर मात केल्यानंतर ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या आयोजकांसमोर आता चिखलाचे आव्हान उभे ठाकले आहे. गेले काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मेलबर्न एरिना येथील अनेक कोर्टवर चिखल जमा झाला असून कोर्टची नासाडीही झाली आहे. यामुळे या कोर्टवरील काही सामने विलंबाने सुरू झाले, तर काही नाइलाजास्तव अन्य कोर्टवर खेळवण्यात आले.