राओनिकला नमवून उपांत्यपूर्व फेरीत; दिमित्रोव्हकडून थीमला पराभवाचा धक्का

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने रविवारी पोटाच्या दुखापतीसह खेळताना ग्रँडस्लॅम कारकीर्दीतील ३००वा विजय साकारला आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच अलेक्झांडर झ्वेरेव्ह, सेरेना विल्यम्स यांनीही आगेकूच केली. परंतु डॉमिनिक थीमला मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

जोकोव्हिचने स्वित्झर्लंडच्या १४व्या मानांकित मिलोस राओनिकला ७-६ (७-४), ४-६, ६-१, ६-४ असे चार सेटमध्ये नमवले. हा सामना तीन तासांपर्यंत लांबला. तिसऱ्या फेरीत टेलर फ्रिट्झवर सरशी साधल्यानंतर जोकोव्हिच दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता होती. आता उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी जोकोव्हिचला जर्मनीच्या झ्वेरेव्हशी दोन हात करावे लागतील. सहाव्या मानांकित झ्वेरेव्हने २३व्या मानांकित दुसान लाजोव्हिचवर ६-४, ७-६ (७-५), ६-३ अशी मात केली.

बल्जेरियाच्या १८व्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हने थीमला ६-४, ६-४, ६-० अशी सरळ तीन सेटमध्ये धूळ चारली. दिमित्रोव्हने १ तास आणि ५८ मिनिटांतच हा सामना जिंकला. त्याशिवाय एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रथमच थीमला एखाद्या सेटमध्ये एकही गेम जिंकता आला नाही.

महिला एकेरीत अमेरिकेच्या ३९ वर्षीय सेरेनाने आर्यना सबालेंकावर ६-४, २-६, ६-४ असा विजय मिळवला. रोमानियाच्या दुसऱ्या मानांकित सिमोना हालेपने इगा स्विआँटेकवर ३-६, ६-१, ६-४ अशी पिछाडीवरून सरशी साधली. त्यामुळे सेरेना विरुद्ध हालेप असा उपांत्यपूर्व  फेरीत सामना रंगेल.

जपानच्या तिसऱ्या मानांकित नाओमी ओसाकाने गर्बिन मुगुरुझावर ४-६, ६-४, ७-५ अशी मात करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिच्यासमोर शि सू-वेईचे आव्हान असेल. सु-वेईने मार्केटा वोंड्रुसोव्हाला ६-४, ६-२ असे सहज पराभूत केले.

जर ही अन्य एखादी

स्पर्धा असती, तर मी या लढतीपूर्वी नक्कीच माघार घेतली असती. परंतु ग्रँडस्लॅम स्पर्धेला माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचे स्थान असल्याने मी खेळण्याचा निर्णय घेतला. पुढील दोन दिवसांत अधिक तंदुरुस्त होण्यावर लक्ष केंद्रित करून मी उपांत्यपूर्व फेरीत खेळण्यासाठी कोर्टवर उतरेन.   – नोव्हाक जोकोव्हिच