ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा

पाठीच्या दुखापतीने त्रस्त असतानाही स्पेनच्या राफेल नदालने २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या दिशेने कूच केली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या नदालने तसेच महिलांमध्ये अग्रमानांकित अ‍ॅशले बार्टी यांनी आपापले सामने सहज जिंकत विजयी सलामी नोंदवली.

नदालने सलामीच्या लढतीत सर्बियाच्या लासलो जेरे याचे आव्हान ६-३, ६-४, ६-१ असे परतवून लावले. आता दुसऱ्या फेरीत नदालला अमेरिकेच्या मायकेल मोह याचा सामना करावा लागेल. मोह याने विक्टर ट्रायोकी याच्यावर पाच सेटपर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत ७-६ (३), ६-७ (३), ३-६, ७-६ (३), ७-५ असा पाडाव केला.

‘‘माझ्या पाठीची दुखापत पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यात दरदिवशी सुधारणा करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे सकारात्मक राहून एका वेळी एकाच सामन्याचा विचार मी करत आहे,’’ असे नदालने सांगितले. चौथ्या मानांकित डॅनिल मेदवेदेव याने व्ॉसेक पॉस्पिसिल याला ६-२, ६-२, ६-४ असे हरवत सलग १५वा विजय प्राप्त केला. सातव्या मानांकित आंद्रेय रुबलेव्ह याने यानिक हाफमान याचा ६-३, ६-३, ६-४ असा पाडाव केला.

महिलांमध्ये अग्रमानांकित अ‍ॅशले बार्टी हिने वर्षभरानंतर कोर्टवर धडाक्यात पुनरागमन करताना डान्का कोविनिक हिच्यावर ६-०, ६-० असा दमदार विजय मिळवला. मॅडिसन इंगलिस गतविजेत्या सोफिया केनिनला चांगलेच झुंजवले. अखेर केनिनने ७-५, ६-४ असा विजय मिळवत दुसरी फेरी गाठली.

गतउपविजेत्या गार्बिन मुगुरुझा हिने मार्गारिटा गास्पारयान हिला ६-४, ६-० असे पराभूत केले. दोन वेळा ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकणारी विक्टोरिया अझारेंका हिला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. दुखापतीमुळे वैद्यकीय उपचार करवून घेणाऱ्या अझारेंकाला अमेरिकेच्या जेसिका पेगुला हिने ५-७, ४-६ असे हरवले.