ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणजे टेनिस विश्वाचा मानबिंदू. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने ग्रँडस्लॅम पर्वाचा श्रीगणेशा होतो. जेतेपदासह हंगामाची सुरुवात करण्यास उत्सुक टेनिसपटूंसाठी हे हक्काचे ठिकाण. मात्र गेल्या काही वर्षांपासून या स्पर्धेदरम्यान सिडनीतील अतिउष्ण वातावरण टेनिसपटूंसाठी घातक ठरू लागले होते. प्रखर उन्हात होणाऱ्या सामन्यांमुळे थकवा, चक्कर यांसारख्या व्याधींचे प्रमाण वाढू लागले होते. हे सर्व ध्यानात घेऊन संयोजकांनी उष्ण वातावरणासंदर्भात नवे धोरण अंगीकारले आहे. पाऱ्याने ४० सेल्सिअसचा आकडा ओलांडला तर तत्क्षणी सामने बंद करण्यात येतील, अशी भूमिका संयोजकांनी घेतली आहे.
वर्षांच्या सुरुवातीला सिडनीतील वातावरण तापते. गेल्या वर्षी स्पर्धेदरम्यान चार दिवशी पाऱ्याने ४०चा आकडा ओलांडला. १९०६ नंतर पहिल्यांदाच एवढय़ा प्रचंड तापमानाची नोंद झाली. यंदा असे होणार नाही अशी आशा आहे, मात्र टेनिसपटूंना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नवे धोरण अंगीकारल्याचे संयोजकांनी सांगितले.
‘पाऱ्याने चाळिशी गाठली आणि आद्र्रतेचे प्रमाण ३२.५ असेल तर सामनाधिकारी उष्णता धोरण लागू करतील. त्या क्षणापासून सामना थांबवण्यात येईल. याआधी तो सेट संपेपर्यंत खेळ सुरू राहत असे. मात्र आता टेनिसपटूंना सक्तीने खेळावे लागणार नाही. ज्या कोर्टवर आच्छादनाची सोय आहे तिथे छत उभारले जाईल आणि खेळाला पुन्हा सुरुवात होईल’, असे स्पर्धा संचालक क्रेग टिले यांनी सांगितले.
यंदा स्पर्धेत वापरण्यात येणारे आच्छादन छत कमीत कमी वेळात कोर्टवर उभारले जाईल आणि त्याचा दर्जाही सर्वोत्तम असेल असा विश्वास टिले यांनी व्यक्त केला. प्रथमच स्पर्धेच्या प्रक्षेपणाचे हक्क सोनी सिक्स कंपनीकडे असून, १४ कोर्ट्सवर रंगणारा थरार प्रेक्षकांना अनुभवता येईल असे त्यांनी सांगितले.