वेग आणि अचूकतेच्या जोरावर झंझावाती फॉर्म असणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन बांगलादेशात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी डग बोलिंजरचा संघात समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या तांत्रिक समितीने या बदलाला मंजुरी दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान जॉन्सनच्या उजव्या पायाच्या बोटाला दुखापत झाली. या दुखापतीमुळे जॉन्सन आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतही खेळू शकला नाही. या कालावधीत तो दुखापतीतून सावरेल अशी ऑस्ट्रेलियाच्या संघव्यवस्थापनाला आशा होती. मात्र ही दुखापत बरी होण्यासाठी अजूनही वेळ लागणार असल्याने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. जस्टीन पालोनी यांनी सांगितले.
दरम्यान जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या आणि सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या जॉन्सनची ऑस्ट्रेलियाला उणीव भासणार आहे. आशियाई उपखंडात खेळण्याचा अनुभव बोलिंजरकडे आहे मात्र २०११ नंतर बोलिंजर ऑस्ट्रेलियासाठी ट्वेन्टी-२० सामना खेळलेला नाही.