करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु करताना आयसीसीने काही नवीन नियम आखून दिले. यात गोलंदाजांना चेंडूला चमक आणण्यासाठी लाळ किंवा थुंकी अशा गोष्टींचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. काऊंटी क्रिकेटमध्ये ससेक्स संघाकडून खेळणारा ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिच क्लायडॉनने चेंडू चमकवण्यासाठी चक्क हँड सॅनिटायजरचा वापर केला आहे. बॉब विलीस ट्रॉफीत ससेक्स विरुद्ध मिडलसेक्स सामन्यादरम्यान हा प्रकार घडला आहे. नियमांचा भंग केल्याप्रकरणी मिच क्लायडॉनवर एका सामन्याची बंदी घालण्यात आलेली असून तो सरेविरुद्ध पुढील सामन्यात खेळू शकणार नाहीये.

ससेक्स संघाने अधिकृत पत्रक काढत क्लॉयडॉनवर होत असलेल्या कारवाईविषयी माहिती दिली. पहिल्या डावात क्लायडॉनने हा प्रकार केला ज्यात त्याने ३ बळी घेतले. ३७ वर्षीय क्लॉयडॉन हा ऑस्ट्रेलियन प्रथमश्रेणी क्रिकेटमधला दिग्गज खेळाडू मानला जातो. आतापर्यंत त्याने ११२ प्रथमश्रेणी तर ११० अ-श्रेणीचे सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ३१० बळी जमा आहेत. याप्रकरणी योग्य ती चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असं आश्वासन ससेक्स संघ व्यवस्थापनाने दिलं आहे.