काही दिवसांपूर्वी आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीकडून जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार १८ आणि १९ सप्टेंबर असे सलग दोन दिवस भारताचा एकदिवसीय सामना प्रतिस्पर्धी संघाबरोबर आयोजित करण्यात आला आहे. या आशिया चषकाच्या आयोजनावर BCCIने कडक शब्दात नाराजी व्यक्त केली होती. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स याने मात्र वेळापत्रकातील नियोजन चुकीचे नसल्याचे म्हटले आहे.

‘आम्ही आमच्या कारकिर्दीत अनेकदा सलग दिवशी सामने खेळले आहेत. मग आताचे खेळाडूच सलग दिवशी सामने खेळण्यास तक्रार का करत आहेत? असा सवाल त्यांनी भारतीय संघाला आणि BCCI ला केला आहे. हेच खेळाडू पाच दिवसांचे कसोटी सामने खेळू शकतात, मग सलग दोन दिवस एकदिवसीय सामने खेळण्यास काय अडचण आहे. सलग सामने खेळल्याने खेळाडू मरणार नाहीत, असे विधान डीन जोन्स याने केले आहे.

या स्पर्धेसाठी भारताचा समावेश अ गटात करण्यात आला असून भारतासोबत पाकिस्तानचाही याच गटात समावेश करण्यात आला आहे. अ गटात भारताचा १९ तारखेचा सामना पाकिस्तानशी निश्चित आहे, तर १८ तारखेचा सामना कोणाशी होणार ते अद्याप ठरलेले नाही. मात्र १८ आणि १९ सप्टेंबर रोजी भारताला लागोपाठ वन-डे सामने खेळायचे आहेत.