इंडियन प्रीमियर लीगपेक्षा (आयपीएल) ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला खेळाडूंनी प्राधान्य देण्याची नितांत आवश्यकता आहे. राष्ट्रीय क्रिकेट मंडळांनी आपल्या खेळाडूंना ‘आयपीएल’मध्ये खेळण्यास बंदी घालावी, असे आवाहन ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर यांनी केली आहे.

‘‘ट्वेन्टी-२० लीग म्हणजे खेळाडूंना भरमसाट पैशांची कमाई करून देणारे व्यासपीठ आहे. त्यामुळेच मला त्या आवडत नाहीत. स्थानिक लीगपेक्षा जागतिक स्पर्धाना महत्त्व देण्याची गरज आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे स्थान अग्रेसर आहे. त्यामुळेच ‘आयपीएल’मध्ये खेळण्यास मंडळांनी खेळाडूंना मज्जाव करावा,’’ अशा शब्दांत बॉर्डर यांनी विविध क्रिकेट लीगवर ताशेरे ओढले आहेत.

भारताचा कर्णधार विराट कोहलीसारख्या क्रिकेटपटूंमुळे कसोटी क्रिकेट जिवंत आहे, असे बॉर्डर यांनी सांगितले. ‘‘विराट हा आक्रमक क्रिकेटचे उत्तम उदाहरण आहे. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासारख्या संघांमुळे क्रिकेट लीगच्या लाटेत कसोटी क्रिकेट तरू शकले आहे,’’ असे बॉर्डर यांनी सांगितले.

विराटच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड!

अखेरच्या तीन कसोटी सामन्यांत विराटच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर चषकावर नाव कोरण्याची शक्यता वाढली आहे, असे मत बॉर्डर यांनी व्यक्त केले. ‘‘विराट फक्त पहिल्याच कसोटी सामन्यात खेळणार आहे, ही एकच बाब ऑस्ट्रेलियासाठी अनुकूल ठरते आहे. मात्र हीच भारतासाठी मोठी चिंता ठरेल. एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून विराट अतुलनीय आहे. पण विराट नसल्यास ऑस्ट्रेलिया ही मालिका २-१ अशी जिंकू शकेल,’’ असा दावा बॉर्डर यांनी केला आहे. ‘‘विराटच्या अपत्याचा जन्म ऑस्ट्रेलियात व्हावा अशी आमची अपेक्षा होती. म्हणजे विराटपुत्र ऑस्ट्रेलियन आहे, असा आम्ही दावा करू शकलो असतो,’’ असे बॉर्डर यांनी सांगितले.