श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी मार्श बंधूंना संघातून डच्चू ; फिंच, हॅँड्सकोम्बदेखील बाहेर

सिडनी : युवा फलंदाज विल पुकोव्हस्की याची श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात निवड करण्यात आली आहे. तर, अनुभवी शॉन मार्श व अष्टपैलू मिचेल मार्श यांची मात्र संघातून गच्छंती झाली आहे.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला २-१ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी आरोन फिंच व पीटर हँड्सकोम्ब यांनादेखील संघातून वगळण्यात आले आहे. जो बर्न्‍सचे संघात पुनरागमन झाले असून मार्कस हॅरिसने संघातील स्थान कायम राखले आहे. मात्र त्यांना मॅट रेनशॉकडून कडवी झुंज मिळणार आहे.

दरम्यान २० वर्षीय पुकोव्हस्की स्थानिक क्रिकेटमध्ये व्हिक्टोरिया संघाचे प्रतिनिधित्व करतो. आठ प्रथम श्रेणी सामन्यांतील एका द्विशतकांसह त्याने दमदार कामगिरी केली असल्यानेच त्याची संघात निवड करण्यात आली असल्याचे निवड समितीचे अध्यक्ष ट्रेव्हर हॉन्स यांनी सांगितले.

ऑफस्पिनर मार्नस लाबुश्चानेची निवड झाली असून मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड व पॅट कमिन्स ही वेगवान गोलंदाजांची फळी कायम राखण्यात आलेली आहे. मार्श बंधूंची संघातून गच्छंती केल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमींना  धक्का बसला आहे. भारताविरुद्ध कसोटी मालिकेत दोन फलंदाजांशिवाय कुणाचीच कामगिरी चांगली नसताना त्या दोघांनाच का वगळले, हा सवाल आहे.

ऑस्ट्रेलिया संघ

जो बर्न्‍स, बॅट कमिन्स, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुश्चाने, नॅथन लायन, टिम पेन (कर्णधार), विल पुकोव्हस्की, मॅट रेनशॉ, मिचेल स्टार्क, पीटर सिडल.