कर्णधार जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विंडीजने घरच्या मैदानावर खेळताना ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. अँटीग्वा येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडीजने इंग्लंडवर १० गडी राखून मात केली आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. विंडीजचा इंग्लंडविरुद्धचा गेल्या १० वर्षातला हा पहिला कसोटी मालिका विजय ठरला. षटकांची गती कमी राखल्यामुळे विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याला तिसऱ्या कसोटीतून ICC ने निलंबित केले.

यावरून ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न ICC वर चांगलाच भडकला. हा सामना केवळ ३ दिवसात संपला होता. कोणताही कसोटी सामना षटकांची गती कमी राखल्यावर ३ दिवसात संपत नाही. पण होल्डरला मात्र या कारणासाठी निलंबित करण्यात आले. अशा पद्धतीची कारवाई करताना ‘कॉमन सेन्स’ कुठे गेला होता?, असा सवाल वॉर्नने ICC ला केला. याच ट्विटमध्ये वॉर्नने विंडीजच्या संघाचे अभिनंदनदेखील केले आहे.

दरम्यान, नाणेफेक जिंकून सामन्यात प्रथम गोलंदाजी केलेल्या विंडीजने इंग्लंडला १८७ धावांमध्ये रोखलं. केमार रोचचे ४ बळी आणि त्याला शेनॉन गॅब्रिअलने ३ बळी घेत दिलेली भक्कम साथ या जोरावर पहिल्या डावावर विंडीजने वर्चस्व गाजवलं. इंग्लंडकडून मधल्या फळीत जॉनी बेअरस्टो आणि मधल्या फळीतल्या मोईन अलीने अर्धशतकी खेळी केली. या दोघांना बेन फोक्सने चांगली साथ दिली, मात्र खेळपट्टीवर जास्तकाळ टिकून राहणं त्यांना जमलं नाही. इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे इंग्लंड पहिल्या डावात १८७ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

प्रत्युत्तरादाखल विंडीजने इंग्लंडच्या गोलंदाजांचा पुरता समाचार घेतला. विंडीजच्या पहिल्या ४ क्रमांकाच्या फलंदाजांनी ४० च्या वर धावा काढून आपल्या संघाला भक्कम पायाभरणी करुन दिली. या जोरावर विंडीजने ३०६ धावा करत इंग्लंडवर ११९ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडून पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉड आणि मोईन अलीने प्रत्येकी ३-३ बळी घेतले. यानंतर दुसऱ्या डावातही इंग्लंडच्या संघाची पुरती दाणादाण उडाली. केमार रोच आणि कर्णधार जेसन होल्डर यांनी प्रत्येकी प्रत्येकी ४ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं.

दुसऱ्या डावात इंग्लंडचा एकही फलंदाज अर्धशतकी खेळी उभारु शकला नाही. यानंतर विजयासाठी आवश्यक असलेलं १४ धावांचं आव्हान विंडीजच्या सलामीवीरांनी पूर्ण करत आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.