सिनसिनाटी : ऑस्ट्रेलियाचा वादग्रस्त टेनिसपटू निक किर्गिऑस याने सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यादरम्यान स्वत:च्याच दोन रॅकेट्स मोडत खुर्चीवरील पंचांशी वाद घातला होता. त्यामुळे त्याला १,१३,००० डॉलरची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र या प्रकरणाची चौकशी सुरू असल्यामुळे किर्गिऑसवर बंदीची टांगती तलवार लटकत आहे.

चेंडूचा सन्मान न राखणे, परवानगी न घेता कोर्टवरून बाहेर जाणे, असभ्य वर्तन तसेच अखिलाडूवृत्ती अशा विविध आरोपांसाठी त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्यामुळे किर्गिऑसला बंदीच्या शिक्षेलाही सामोरे जावे लागणार आहे, असे व्यावसायिक टेनिसपटूंच्या संघटनेकडून (एटीपी) सांगण्यात आले. रशियाच्या करेन खाचानोव्ह याच्याकडून ६-७ (३/७), ७-६ (७/४), ६-२ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर किर्गिऑसने हे कृत्य केले होते.