ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघानं भारताचा आरामात पराभव केला आहे. मुंबईतल्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये टी-20 तिरंगी स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारताला पराभवाची चव ऑस्ट्रेलियाविरोधात पुन्हा चाखावी लागली आहे. ऑस्ट्रेलियाची कप्तान मेग लॅनिंगनं टॉस जिंकून भारताला फलंदाजी दिली. मिथाली काज व मुंबईकर स्मृती मानधनानं चांगली सुरूवात करताना 72 धावांची भागीदारी केली. परंतु नंतर हव्या तितक्या धावा उरलेल्या खेळांडुकडून झाल्या नाहीत.
स्मृतीनं 67 धावा केल्या तर मिथालीनं 18 धावा केल्या. अॅशले गार्डनरनं मिथालीला बाद केलं तर तिनंच नंतर स्मृतीची विकेट घेतली.
भारताची कप्तान हरमप्रीत कौर अवघ्या 13 धावा करून तंबूत परतली तर जेमिमा रॉड्रिग्ज शून्यावर बाद झाली. मधल्या फळीतल्या वेदा कृष्णमूर्ती व अनुजा पाटील यांनी 41 धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला. या बळावर भारतानं पाच बळी गमावत 150 चा टप्पा पार केला. अनुजा पाटीलनं 35 धावा केल्या आणि भारतानं ऑस्ट्रेलियाला 153 धावांचं लक्ष्य दिलं.
दुखापतीतून बाहेर आलेल्या भारताच्या वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीनं चांगली सुरूवात करून दिली. तिनं अॅलिसा हिली व गार्डनर या दोघींचा बळी मिळवला. सुरुवातीच्या पडझडीनंतर बेथ मुनी व एलिस विलानी यांनी 78 धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला आणि भारताच्या विजयाच्या आशा धुळीला मिळाल्या. मुनी 45 तर विलानी 39 धावा करून बाद झाली. पूनम यादवनं दोघींना बाद केलं. परंतु नंतर लॅनिंग व राशेल हेन्स यांनी एकही विकेट न गमावता ऑस्ट्रेलियाला आरामात विजय मिळवून दिला. आता ऑस्ट्रेलियाचा मुकाबला हीदर नाईटच्या इंग्लंड संघाविरुद्ध शुक्रवारी रंगणार आहे.