सलामीवीर निकोल बोल्टनच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर, ऑस्ट्रेलियन महिलांनी पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय महिलांवर ८ गडी राखून विजय मिळवला. भारतीय महिलांनी दिलेलं २०१ धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने ३२.१ षटकांत पूर्ण करत सामन्यात विजय संपादन केला.

या सामन्यात भारतीय महिलांचं संघ कमी धावसंख्येवर बाद होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र सुषमा वर्मा आणि पुजा वस्त्राकर यांच्यात आठव्या विकेटसाठी झालेल्या ७६ धावांच्या भागीदारीमुळे भारताने सन्मानजनक धावसंख्येचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाची डावखुरी फिरकीपटू जेस जॉन्सनने १० षटकांत अवघ्या ३० धावा देत ४ बळी घेतले. डावखुरी फिरकीपटू अमांदा वेलिंग्टनने ३ बळी घेत जेसला चांगला हातभार लावला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा सामना गुरुवारी होणार आहे.

बोल्टनच्या शतकी खेळीमुळे भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ कधीडी अडचणीत आढळलेला दिसला नाही. दोन विकेट पडल्यानंतरही बोल्टनने भारतीय गोलंदाजीवर आक्रमण करत आपला लढा सुरुच ठेवला. मात्र सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारताने आजच्या सामन्यात निराशा केली. एकही भारतीय महिला फलंदाज आजच्या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही. स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, जेमिया रॉर्ड्रीग्ज या सर्व फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतल्या. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.