तिसऱ्या दिवसअखेर ४१७ धावांची आघाडी; बर्न्‍स, लबूशेन यांची अर्धशतके

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड कसोटी मालिका

सलामीवीर जो बर्न्‍स (५३ धावा) आणि पहिल्या डावातील शतकवीर मार्नस लबूशेन (५०) या दोघांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. टिम साऊदी (४/६३) आणि नील व्ॉगनर (२/४०) या वेगवान जोडीच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद १६७ धावा अशी अवस्था झाली असली तरी, त्यांच्याकडे एकूण ४१७ धावांची आघाडी जमा आहे.

शुक्रवारच्या ५ बाद १०९ धावांवरून पुढे खेळताना मिचेल स्टार्कच्या (५/५२) गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचा पहिला डाव १६६ धावांत आटोपला. रॉस टेलरने (८०) न्यूझीलंडतर्फे एकाकी झुंज दिली. पहिल्या डावात २५० धावांची आघाडी मिळूनही ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजी केली. दिवसअखेर मॅथ्यू वेड ८ आणि पॅट कमिन्स १ धावेवर खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक

* ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ४१६

* न्यूझीलंड (पहिला डाव) : ५५.२ षटकांत सर्व बाद १६६ (रॉस टेलर ८०, केन विल्यम्सन ३४; मिचेल स्टार्क ५/५२)

* ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ५७ षटकांत ६ बाद १६७ (जो बर्न्‍स ५३, मार्नस लबूशेन ५०; टिम साऊदी ४/६३)