सुप्रिया दाबके

क्रीडा क्षेत्रात अनेक वर्षे केलेल्या मेहनतीला ध्यानचंद पुरस्कारासारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया नंदन बाळ, प्रदीप गंधे आणि तृप्ती मुरगुंडे यांनी व्यक्त केली.

टेनिस क्षेत्रात अनेक वर्षे खेळाडू आणि आता प्रशिक्षक म्हणून योगदान देणारे नंदन बाळ म्हणाले की, ‘‘याआधी दोन वेळा ध्यानचंद पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. मात्र त्यावर शिक्कामोर्तब झाले नव्हते. यंदा ध्यानचंद पुरस्कार मला घोषित झाला. अनेक वर्षांच्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटले. या पुरस्कारामुळे आणखी जबाबदारी वाढली आहे, हे मात्र नक्की. टेनिससारख्या खेळात प्रशिक्षक म्हणून अनेक वर्षे योगदान देत आहे. या पुरस्कारामुळे आणखी चांगल्या पद्धतीने खेळासाठी योगदान देण्याकरिता आता आणखी काम करणार आहे. संदीप कीर्तनेसारखे अनेक नामांकित टेनिसपटू मी घडवले आहेत. डेव्हिस चषकाचा कर्णधार म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.

माजी बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक तृप्ती मुरगुंडे म्हणाल्या की,‘‘माझी बॅडमिंटन खेळातील कारकीर्द २२ वर्षांची  आहे. ध्यानचंद पुरस्कार मिळवण्यासाठी भरपूर मेहनत केली असून त्यागही खूप केला आहे. लग्नानंतरही माझे खेळाशी असलेले नाते कायम आहे. भारताच्या बॅडमिंटन संघाची प्रशिक्षक म्हणूनही मी जबाबदारी पार पाडते. याशिवाय मी समालोचनही करते. पुरस्कार मिळाल्याने खेळात आता आणखी योगदान देण्याच्या दृष्टीने जबाबदारी वाढणार आहे.’’

बॅडमिंटन प्रशिक्षक आणि संघटक प्रदीप गंधे म्हणाले की, ‘‘पुरस्कार मिळावेत या उद्देशाने मी कधीच काही वेगळे केले नाही. सुरुवातीला बॅडमिंटन खेळाडू म्हणून, नंतर प्रशिक्षक म्हणून आणि नंतर खेळातील प्रशासक म्हणून सातत्याने योगदान देण्याचा प्रयत्न केला. ध्यानचंद पुरस्कार घोषित झाल्याने खेळातील योगदानाची सरकारने दखल घेतल्याचे समाधान आहे. माझ्या बॅडमिंटन कारकीर्दीत मला माझ्या कुटुंबाचे आणि पत्नीचे मोठे योगदान मिळाले. ज्या देशांचा खेळाडू म्हणून दौरा केला तेथील खेळाच्या पायाभूत सुविधा समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा नेहमी फायदाच झाला.’’