रविंद्र जाडेजावर एका सामन्याच्या बंदीची शिक्षा लादण्यात आल्यानंतर, तिसऱ्या कसोटीत संघात कोणत्या फिरकीपटूला स्थान मिळणार यावर चर्चांना उधाण आलं आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार कुलदीप यादवऐवजी तिसऱ्या कसोटीत अक्षर पटेलचा संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयमधल्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिलेली आहे.

अक्षर पटेल सध्या दक्षिण आफ्रिकेत भारत ‘अ’ संघाकडून वन-डे मालिकेत खेळतो आहे. या मालिकेतल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्याची कसोटी संघात निवड झालेली आहे. आफ्रिका दौरा आटोपून अक्षर गुरुवारी म्हणजेच १० ऑगस्टपर्यंत भारतीय संघात दाखल होऊ शकतो. रविंद्र जाडेजाप्रमाणे अक्षर पटेल संघात भरीव कामगिरी करु शकतो असा संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयला विश्वास आहे. त्यामुळे चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला डावलून अक्षर पटेलला पल्लकेले कसोटीत संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा – जाडेजावर बंदीच्या कारवाईमुळे ‘या’ खेळाडूची संघात निवड

पहिल्या दोन कसोटीप्रमाणे भारताने तिसऱ्या कसोटीत दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला, तर संघ व्यवस्थापन अक्षर पटेलला संघात स्थान देऊ शकते. पल्लकेलेच्या खेळपट्टीवर अक्षर पटेल श्रीलंकेसाठी धोकादायक ठरु शकतो, असं संघ व्यवस्थापनाच्या एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना नमूद केलंय.

कोलंबो कसोटीत आयसीसी नियमांचा भंग केल्याप्रकरणी जाडेजावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. जाडेजाच्या जागी निवड करण्यात आलेल्या अक्षर पटेलला कसोटी सामन्यांचा अनुभव नसला तरीही राष्ट्रीय पातळीवर त्याची कामगिरी दुर्लक्षित करण्यासारखी नाहीये. २३ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये अक्षर पटेलने १० अर्धशतकं आणि १ शतक झळकावलं आहे. याचसोबत पटेलने प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ७९ बळी घेतले आहेत.

अक्षर पटेलकडे आंतराष्ट्रीय स्तरावर ३० वन-डे आणि ७ टी-२० सामन्यांचा अनुभव आहे. यादरम्यान पटेलला फलंदाजीत आपली कमाल दाखवता आली नसली तरीही गोलंदाजीत त्याने महत्वाच्या विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे शनिवारी सुरु होणाऱ्या कसोटीआधी संघ व्यवस्थापन कुलदीप यादव की अक्षर पटेलला संघात स्थान देतं हे पहावं लागणार आहे.