एम. ए. चिदम्बरम (चेपॉक) स्टेडियमवर आज, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच भारतीय संघाला धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियात सुरु झालेली दुखापतीची मालिका मायदेशातही सुरु आहे. बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार अष्टपैलू अक्षर पटेल याला दुखापत झाल्यामुले पहिल्या कसोटीला मुकणार आहे. अक्षर पटेलऐवजी संघात शाबाज नदीम आणि राहुल चहर या दोन फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. पदार्पणाची संधी मिळण्याआधीच अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा दुखापतग्रस्त खेळाडूंची चर्चा सुरु झाली आहे.

भारतीय संघ चेन्नईत तीन फिरकी गोलंदाजांसह खेळणार असून, रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव यांच्या साथीला अक्षर पटेलला पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र आता वॉशिंगटन सुंदरचं संघातील स्थान जवळपास निश्चित मानलं जात आहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्यात अष्टपैलू चमक दाखवणारा वॉशिंग्टन सुंदर हा रवींद्र जडेजाच्या जागेसाठी कडवा दावेदार होता.


इंग्लंडला दुखापतीचं गृहण
सलामीवीर फलंदाज झॅक क्रॉवलेने मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांतून माघार घेतली आहे. त्यामुळे रॉरी बर्न्‍स आणि डॉम सिब्ले यांच्यावर सलामीची जबाबदारी असेल. डॅनियल लॉरेन्स तिसऱ्या स्थानावर खेळेल, तर रूट, जोस बटलर, बेन स्टोक्स हे महत्त्वाचे खेळाडू अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर उतरतील.

ऑस्ट्रेलियात संस्मरणीय विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाकडे वर्तमानाचे पाठबळ आहे, तर श्रीलंकेत निर्भेळ यश मिळवणाऱ्या इंग्लंड संघाकडे २०१२च्या ऐतिहासिक विजयाचा भूतकाळ गाठीशी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१८मध्ये पदार्पण करणाऱ्या जसप्रित बुमराचा हा मायदेशातील पहिला कसोटी सामना आहे. बुमराच्या साथीला इशांत शर्मा आणि ऑस्ट्रेलियात यशस्वी कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराज यांच्यापैकी एकाची निवड होऊ शकेल. दुखापत आणि करोनाच्या विश्रांमुळे वर्षभरानंतर पुनरागमन करीत आहे. गतवर्षी बेसिन रिझव्‍‌र्हला खेळलेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात इशांतने पाच बळी मिळवले होते.