भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संधी दिली तर भारतीय संघाचे प्रशिक्षक होण्यासाठी आपण तयार असल्याचे ज्येष्ठ कसोटीपटू महम्मद अझरुद्दीन यांनी येथे सांगितले.
आजपर्यंत क्रिकेटमध्ये मी जी काही थोडी कारकीर्द केली आहे, त्यामध्ये मला बरेच काही शिकायला मिळाले आहे. हे कौशल्य युवा खेळाडूंना देण्यासाठी मी उत्सुक झालो आहे. भारतीय क्रिकेट क्षेत्रात सक्रिय काम करण्याची माझी इच्छा आहे. अर्थात संघाकरिता प्रशिक्षक कोणास नेमायचे हा निर्णय मंडळाने घ्यावयाचा आहे. मी क्रिकेटमध्ये देशाची सेवा करण्यास तयार आहे, असे अझर यांनी सांगितले.
लॉर्ड्स येथे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकणाऱ्या भारत व पाकिस्तान विद्यार्थ्यांमध्ये मित्रत्वाचा सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यास मुख्य अतिथी म्हणून अझरुद्दीन उपस्थित होते.
मॅच फिक्सिंगच्या आरोपांतर्गत अझरुद्दीनवर क्रिकेट खेळण्यास तहहयात बंदी घालण्यात आली होती. आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ही बंदी उठविली होती. अझर हे मुरादाबाद येथून काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले आहेत.
अझरुद्दीन म्हणाले, ‘‘भारतीय संघाला नवीन रक्ताची आवश्यकता आहे. युवा खेळाडूंना संघात संधी देण्याची आवश्यकता आहे. युवा खेळाडूंसाठी आयपीएल स्पर्धा म्हणजे कौशल्य दाखविण्याची उत्तम संधी आहे. या संधीचा उपयोग करीत युवा खेळाडूंनी भारतीय निवड समितीची दारे ठोठावली पाहिजेत.’’