चेंगझोऊ (चीन) : भारताचे एकमेव आशास्थान उरलेल्या बी. साईप्रणीतला शुक्रवारी चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. साईप्रणीतच्या पराभवासह भारताचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

ऑगस्ट महिन्यात जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या साईप्रणीतला इंडोनेशियाच्या अ‍ॅन्थोनी सिनिसुकाने ५५ मिनिटांत १६-२१, २१-६, २१-१६ असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या अ‍ॅन्थोनीचा उपांत्य फेरीतील सामना डेन्मार्कच्या आंद्रेस अँटोन्सेनशी होणार आहे. या विजयाबरोबरच साईप्रणीत आणि अ‍ॅन्थोनी यांच्यातील सामन्यांची आकडेवारी ३-३ अशा बरोबरीत पोहचली आहे.

२७ वर्षीय साईप्रणीतने दमदार सुरुवात करताना पहिला गेम जिंकला. त्याने विशेषत: नेटजवळून फटक्यांचा सुरेख वापर केला. परंतु दुसऱ्या गेममध्ये अ‍ॅन्थोनीने साईप्रणीतला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. त्याने मध्यंतराला ११-५ अशी आघाडी घेऊन २१-६ असा सहज गेम खिशात घातला.

निर्णायक गेममध्ये साईप्रणीतने अ‍ॅन्थोनीला कडवी झुंज दिली.

१३-१२ अशी आघाडी असताना अ‍ॅन्थोनीने सलग चार गुण मिळवून साईप्रणीतवरील दडपण वाढवले व अखेरीस २१-१६ अशा फरकाने गेमसह सामना जिंकला.