भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर तयार झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे बीसीसीआयला IPL च्या तेराव्या हंगामासाठी VIVO कंपनीसोबतचा करार स्थगित करावा लागला. चिनी कंपनीसोबतचा करार मोडावा यासाठी बीसीसीआयवर भारतीय चाहत्यांकडून दबाव वाढत होता. तेराव्या हंगामासाठी बीसीसीआय सध्या नवीन स्पॉन्सर शोधण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार Jio, Byju’s, Amazon, Coca Cola हे ब्रँड तेराव्या हंगामाला स्पॉन्सरशिप देण्याच्या प्रयत्नात आहेत. यानंतर योगगुरु बाबा रामदेव यांचा पतंजली हा ब्रँडही आयपीएल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत उतरण्याच्या तयारीत आहे. इकोनॉमिक टाइम्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

“पतंजली हा बँड जागतिक पातळीवर पोहचावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आयपीएलच्या तेराव्या हंगामाला स्पॉन्सरशिप देता येईल का यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.” पतंजली उद्योगसुमहाचे प्रवक्ता एस.के. तिजारावाला यांनी इकोनॉमिक टाइम्सला माहिती दिली. यासाठी पतंजली लवकरच आपली निवीदा दाखल करणार असल्याचं समजतंय. अनेक तज्ज्ञांच्या मते सध्याच्या घडीला देशात चीनविरोधी वातावरण असताना पतंजलीने आयपीएलला स्पॉन्सरशिप देणं याने देशात त्यांच्या ब्रँडला मोठा फायदा होऊ शकतो.

दरम्यान VIVO सोबतचा करार स्थगित करण्यात आला असला याचा अर्थ BCCI वर कोणतंही आर्थिक संकट आलेलं नाही. “बीसीसीआयवर कोणतंही आर्थिक संकट आलंय असं मी अजिबात म्हणणार नाही. VIVO सोबतचा करार स्थगित करणं हा परिस्थिती पाहून घेतलेला निर्णय आहे. बीसीसीआय प्रत्येकवेळी दुसरा पर्याय तयार ठेवतं. आतापर्यंत सर्व खेळाडू, राज्य संघटना आणि अधिकारी यांच्या सहकार्याने बीसीसीआयचं कामकाज हे चांगलं चाललेलं आहे. त्यामुळे एखाद्या वर्षी जरी काही अडचण आली तरीही त्याचा फारसा परिणाम होत नाही. प्रत्येक नावाजलेल्या ब्रँडकडे असा दुसरा पर्याय असतोच.” BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने याने एका खासगी कार्यक्रमात बोलताना माहिती दिली.

आयपीएल स्पर्धेच्या स्पॉन्सरशिपसाठी VIVO ने बीसीसीआयला २१९९ कोटी रुपये दिले होते. प्रत्येक हंगामाला VIVO कंपनी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती. आयपीएलच्या तेराव्या हंगामाची घोषणा करताना गव्हर्निंग काऊन्सिलने VIVO ची स्पॉन्सरशिप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतू भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण लक्षात घेता बीसीसीआयने वर्षभरासाठी VIVO सोबतचा करार स्थगित केला आहे.