ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने दमदार पुनरागमन करत 1-0 ने मालिका जिंकली. अबुधाबी कसोटीत पाकिस्तानने ऑस्ट्रेलियावर 347 धावांनी मात केली. दुबई कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा आणि अॅरोन फिंचने सामना अनिर्णित राखून संघाचा पराभव टाळला. मात्र दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानच्या आक्रमणासमोर ऑस्ट्रेलियाचा निभाव लागू शकला नाही. दरम्यान या सामन्यात काही विक्रमांचीही नोंद करण्यात आली.

318 – फिरकीपटू नेथन लॉयन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत चौथा गोलंदाज ठरला आहे. लॉयनच्या खात्यात आता 318 बळी जमा आहेत. या यादीत शेन वॉर्न (708 बळी), ग्लेन मॅकग्रा (563 बळी), डेनिस लिली (355 बळी) हे खेळाडू लॉयनच्या पुढे आहेत.

7 – कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात, चौथ्या-पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरचे फलंदाज शून्यावर बाद होण्याची ही सातवी वेळ ठरली आहे. पहिल्या डावात पाकिस्तानचे हारिस सोहील, असद शाफीक आणि बाबर आझम हे फलंदाज शून्यावर बाद झाले. पाकिस्तानच्या खेळाडूंनी असा पराक्रम करण्याची ही दुसरी वेळ, 2009 साली न्यूझीलंडविरुद्ध नेपियर कसोटीत पाकच्या फलंदाजांनी अशी कामगिरी केली होती.

17 – एकाच कसोटी सामन्यात 3 फलंदाजांनी 90 पेक्षा जास्त धावसंख्या नोंदवण्याची ही सतरावी वेळ ठरली. फखार झमान (94 धावा), सरफराज अहमद (94 धावा) आणि बाबर आझम (99 धावा) यांनी अबुधाबी कसोटीत 90 पेक्षा जास्त धावसंख्या नोंदवली.

7 – ऑस्ट्रेलियाचा कामचलाऊ गोलंदाज मार्नस लाबसचेंजने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 7 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एकालाही या तोडीची कामगिरी करता आलेली नाही. मिचेल स्टार्कने 4, जॉन हॉलंडने 4 तर पिटर सिडलने 3 बळी घेतले आहेत.

373 – पाकिस्तानने 373 धावांनी अबुधाबी कसोटी जिंकली. ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानविरुद्धचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. याआधी 2014 साली पाकिस्ताननेच अबुधाबी कसोटीत 356 धावांनी ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला होता.

0 & 99 – एकाच कसोटीत 0 आणि 99 धावा करणारा पाकिस्तानचा बाबर आझम हा चौथा फलंदाज ठरला आहे. (दोन्ही डावात बाद होण्याचा निकष).. याआधी भारताच्या पंकज रॉय यांनी 1959 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत, पाकिस्तानच्या मुश्ताक मोहम्मद यांनी 1973 साली इंग्लंडविरुद्ध कसोटीत आणि पाकिस्तानच्याच मिसबाह उल हकने 2017 साली वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत अशी कामगिरी केली होती.