पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम हा जगातील पहिल्या क्रमांकाचा एकदिवसीय फलंदाज ठरला आहे. 26 वर्षीय बाबरने तब्बल 1258 दिवस पहिल्या क्रमांकावर विराजमान असलेल्या भारताच्या विराट कोहलीला मागे टाकत ही कामगिरी केली.

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेतील दमदार कामगिरीचा बाबरला फायदा झाला. आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार, बाबरकडे सध्या 865 गुण आहेत. विराटपेक्षा बाबर 8 गुणांनी पुढे आहे. तर, टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा तिसर्‍या क्रमांकावर आहे.

चौथा पाकिस्तानी…

जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल ठरलेल्या पाकिस्तानी फलंदाजांमध्ये बाबरने आता चौथे स्थान मिळवले आहे. त्याच्यापूर्वी झहीर अब्बास (1983-84), जावेद मियांदाद (1988-89) आणि मोहम्मद युसूफ यांनी ही कामगिरी केली आहे. 2010 आणि 2012च्या 19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा बाबर 2015पासून पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचा भाग आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी त्याच्या खात्यात 837 रेटिंग गुण होते, परंतु पहिल्या सामन्यात त्याने शानदार शतकी खेळी केली. त्यानंतर तिसर्‍या व निर्णायक सामन्यात त्याने 94 धावा ठोकल्या आणि ही मालिका पाकिस्तानने 2-1 अशी नावावर केली.

या क्रमवारीत न्यूझीलंडचा रॉस टेलर चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर, शिखर धवन 17व्या स्थानावर आहे.