पीटीआय, टोक्यो

टोक्योमधील करोनाबाबतची परिस्थिती आणखीन गंभीर बनत असताना ऑलिम्पिकच्या पाश्र्वभूमीवर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ऑलिम्पिक स्पर्धा यशस्वीपणे आणि सुरक्षितपणे आयोजित करण्याची शपथ यावेळी दोघांनी घेतली.

जपानमध्ये २० टक्क्य़ांपेक्षा कमी लोकांचे लसीकरण झाले असल्याने जपानच्या जनतेसाठी ऑलिम्पिकचे सुरक्षित आयोजन करण्यात यावे, अशा सूचना सुगा यांनी बाख यांनी केल्या आहेत. ते म्हणाले की, ‘‘जपानी लोकांचा समजूतदारपणा तसेच ऑलिम्पिकच्या यशाकरिता सर्व सहभागी स्पर्धकांनी करोनाबाबतच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ‘आयओसी’ने पुरेपूर प्रयत्न करावेत.’’

‘‘ऑलिम्पिक चळवळीचा भाग म्हणून आम्ही चोखपणे या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून जपानी लोकांच्या जिविताला कोणताही धोका उद्भवणार नाही,’’ असे आश्वासन बाख यांनी दिले आहे. ऑलिम्पिक क्रीडाग्राममध्ये राहणाऱ्या ८५ टक्के स्पर्धक आणि अधिकाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. तसेच ‘आयओसी’चे सदस्य आणि कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण झाले आहे, असेही बाख यांनी नमूद केले.

ऑलिम्पिक रद्द करणे, हा पर्याय नव्हता -बाख

करोनाचे संकट संपूर्ण जगावर घोंघावत असताना, टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रद्द करणे हा पर्याय नव्हता. अनेक वर्षे ऑलिम्पिकची तयारी करणाऱ्या खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून टोक्यो ऑलिम्पिकच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आला, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, ‘‘आयओसी या नात्याने खेळाडूंना डावलणे योग्य नाही. ही स्पर्धा रद्द झाली असती तर खेळाडूंची एक संपूर्ण पिढी आम्ही गमवाली असती. त्यामुळे ऑलिम्पिक रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला नाही. ही स्पर्धा रद्द करून विम्याद्वारे संपूर्ण स्पर्धेची रक्कम आम्हाला सहजपणे वसूल करता आली असती. पण ‘आयओसी’ने हा मार्ग निवडला नाही. उलट अधिक गुंतवणूक करून स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही प्रयत्न केले.’’

पदक सन्मान स्वहस्तेच!

करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना आता स्वत:च स्वत:चा सन्मान करावा लागणार आहे. पदक वितरण सोहळ्यात महत्त्वाचे बदल करत असल्याची घोषणा ‘आयओसी’चे अध्यक्ष थॉमस बाख यांनी बुधवारी केली. ‘‘सन्माननीय व्यक्तींकडून पदकविजेत्यांचा सत्कार केला जाणार नाही. एका ताटात पदके आणल्यानंतर पदक विजेत्या खेळाडूंना ती स्वत:च आपल्या गळ्यात घालावी लागतील,’’ असे बाख म्हणाले.

सिंधूची सलामी पॉलिकार्पोव्हाशी

’  टोक्यो : ऑलिम्पिक स्पध्रेतील बॅडमिंटनमध्ये विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूची २५ जुलैला सलामीची लढत इस्रायलच्या सीनिया पॉलिकार्पोव्हाशी होणार आहे. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमधील अंतिम लढतीत स्पेनच्या कॅरोलिना मरिनकडून पराभूत झाल्यामुळे सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूला या स्पध्रेसाठी सहावे मानांकन देण्यात आले आहे. सिंधूचा ‘ज’ गटात समावेश करण्यात आला असून, या गटात हाँगकाँगच्या शँग यॅन यि हीचा समावेश आहे. यॅन यि जागतिक क्रमवारीत ३४व्या क्रमांकावर आहे, तर पॉलिकार्पोव्हा ५८व्या क्रमांकावर आहे. टोक्यो क्रीडा स्पध्रेच्या संयोजन समितीने बॅडमिंटनच्या पहिल्या दोन दिवसांची कार्यक्रमपत्रिका जाहीर केली.

ऑलिम्पिक गीताचे अनावरण

’  केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी देशातील ऑलिम्पिकपात्र खेळाडूंसाठीच्या ‘चिअरफॉरइंडिया’ या ऑलिम्पिक गीताचे अनावरण केले. देशवासीयांनी ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना भरघोस पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केली. ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार ए. आर. रहमान आणि युवा गायिका अनन्या बिर्ला यांनी हे गाणे तयार केले आहे.

जयदीप, सकिना पॅरालिम्पिकसाठी पात्र

’  पॉवरलिफ्टर जयदीप कुमार आणि सकिना खातून यांनी आगामी टोक्यो पॅरालिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले. जागतिक पॅरा पॉवरलिफ्टिंग महासंघाने द्विपक्षीय हिस्स्यातून भारताला दोन जागा बहाल केल्या. त्यानुसार जयदीप पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात तर खातून महिलांच्या ५० किलो गटात देशाचे प्रतिनिधित्व करेल. खातून हिने २०१४ राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य तसेच २०१८च्या आशियाई पॅरा स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते.