विश्वचषक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदरसिंग हा भारतीय संघ निवड चाचणीत सहभागी होणार आहे. विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात कझाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे.
विजेंदर याने काही दिवसांकरिता सराव शिबिरातून सुट्टी घेतली होती त्यामुळे तो या स्पर्धेत सहभागी होणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र, तो पतियाळा येथील सराव शिबिरात पुन्हा रुजू झाला असून आपण निवड चाचणीत सहभागी होणार असल्याचे त्याने सांगितले.  
विजेंदर म्हणाला,‘‘मी काही वैयक्तिक कारणास्तव सुटी घेतली होती. याचा अर्थ मी विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार नाही अशा अफवा पसरविणे योग्य नाही. मंगळवारी होणाऱ्या चाचणीत मी उतरणार असून विश्वचषक स्पर्धेत पदक मिळविण्याचेच माझे ध्येय आहे.’’
विजेंदर याने २००८ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवित पदक मिळविणारा पहिला भारतीय बॉक्सर होण्याची कामगिरी केली होती. पाठोपाठ त्याने २००९ मध्ये जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवित ऐतिहासिक कामगिरी केली होती.
तो म्हणाला,‘‘लोकांना अफवा पसरविण्यात गंमत वाटत असली तरी त्याचे दु:ख मला होते. अजूनही माझी बॉक्सिंग कारकीर्द संपलेली नाही. अजूनही ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धेत पदक मिळविण्याची क्षमता माझ्याकडे आहे.’’
विजेंदर ७५ किलो किंवा ८१ किलो यापैकी कोणत्या गटात सहभागी होणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत विजेंदरला विचारले असता तो म्हणाला, प्रत्यक्ष चाचणीत उतरल्यानंतरच तुम्हाला माझा गट कळू शकेल.