बॅडमिंटनमधला दुहेरी प्रकार तसा दुर्लक्षितच. या प्रकरातील यशात किंवा अपयशात साथीदाराची भूमिका निर्णायक असते. वैयक्तिक ओळखीपेक्षा जोडी म्हणून जास्त ओळख मिळते. परंतु तरीही अश्विनी पोनप्पाने दुहेरीतच खेळण्याचा पर्याय स्वीकारला. सातत्याने वादविवादांमध्ये आढळणाऱ्या ज्वाला गट्टासह तिने यशस्वी जोडी जमवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर या जोडीने भारताला दिमाखदार यश मिळवून दिले. लंडन ऑलिम्पिकनंतर ज्वालाच्या अनिश्चित विश्रांतीमुळे तिने महाराष्ट्राच्या प्रज्ञा गद्रेसह खेळायला सुरुवात केली. प्रज्ञासोबतसुद्धा तिने दमदार सुरुवात केली. दुहेरीत सकारात्मक वाटचाल सुरू असतानाच अश्विनीने अचानकच एकेरीकडे मोर्चा वळवला आहे.
‘‘फक्त दुहेरीच खेळणार असे काही ठरवले नव्हते. मात्र सुरुवात दुहेरीनेच झाली आणि मग त्यावरच लक्ष केंद्रित केले. बॅडमिंटनचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी एकेरीत कौशल्य आजमावणार आहे. बंगळुरू येथे होणाऱ्या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेदरम्यान एकेरीत पदार्पण करणार आहे,’’ असे अश्विनीने सांगितले. पनवेलमधील पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्सने आयोजित केलेल्या ‘अलेग्रिया-फेस्टिव्हल ऑफ जॉय’ या कार्यक्रमासाठी आलेल्या अश्विनीने ही माहिती दिली.
इंडियन बॅडमिंटन लीगच्या लिलावाआधी ज्वाला तसेच अश्विनीची पायाभूत किंमत कमी करण्यात आली होती. या स्पर्धेतून महिला दुहेरी हा प्रकाराच वगळण्यात आला होता. दुहेरीला मिळणाऱ्या सापत्न वागणुकीमुळे एकेरीकडे वळण्याचा निर्णय घेतला का असे विचारले असता अश्विनी म्हणते, ‘‘भारतात दुहेरीला दुय्यम वागणूक मिळते हे खरे, परंतु त्यामुळे मी एकेरीत खेळण्याचा निर्णय घेतलेला नाही. गेले काही दिवस हा विचार डोक्यात घोळत होता. बंगळुरूच्या स्पर्धेनिमित्ताने हा नवा प्रयत्न करणार आहे. दुहेरीच्या तुलनेत एकेरीचे डावपेच आणि खेळण्याची पद्धत भिन्न असते. या बदलाशी जुळवून घेत सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न असणार आहे.’’
एकेरीत खेळण्याचा पर्याय स्वीकारला असला तरी दुहेरीत ज्वालासह अश्विनी खेळतच राहणार आहे. बॅडमिंटनमधील प्रमुख स्पर्धाच्या बरोबरीने आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्यासाठी कसून सराव करत असल्याचे अश्विनीने सांगितले.