भारताने गेल्या काही वर्षांत बॅडमिंटनमध्ये केलेली प्रगती खूपच कौतुकास्पद असून नजीकच्या काळात हा देश या खेळात सत्ता गाजवेल, अशा शब्दांत चीनचे मुख्य प्रशिक्षक ली याँगबो यांनी भारतीय बॅडमिंटनपटूंचे कौतुक केले आहे.
थॉमस व उबेर चषक जागतिक स्पर्धेला रविवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत चीनचे खेळाडू वर्चस्व गाजवतील अशी अपेक्षा आहे. याँगबो म्हणाले, ‘‘जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी अतिशय चांगली झेप घेतली आहे. जागतिक स्पर्धेत वर्चस्व गाजविण्याची क्षमता भारताकडे आहे, मात्र त्याकरिता त्यांना आणखी एकाग्रतेने प्रयत्न करावे लागतील. एके काळी या खेळात आमच्याबरोबर मलेशिया व इंडोनेशिया यांचेच वर्चस्व होते. आता मात्र आम्हाला भारतीय खेळाडूंकडून आव्हान मिळू लागले आहे.’’
‘‘जागतिक स्तरावर बॅडमिंटनचा दर्जा उंचावत चालला आहे. भारताबरोबरच जपान, थायलंड या देशांनीही या खेळात लक्षणीय प्रगती केली आहे. मात्र संघ म्हणून अव्वल स्थान मिळविण्यासाठी त्यांना कसून सराव करण्याची आवश्यकता आहे,’’ असेही याँगबो म्हणाले.